उदगीर शहरात बिबट्याचा वावर; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
उदगीर शहरासह लगतच्या गावांमध्ये वन कर्मचारी तैनात
उदगीर (प्रतिनिधी) : शहरातील किल्ला परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. या परिसरातील बाळू अण्णा बागबंदे यांच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या दिसून आला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने आवश्यक कार्यवाही सुरु केली असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सहायक वनसंरक्षक व्ही. बी. तांबे यांनी केले आहे.
उदगीर शहरातील बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर वन विभागाने उदगीर शहर व इतर गावांमध्ये वन कर्मचारी तैनात केले आहेत. या परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे. शेतात रात्री, बेरात्री मुक्काम करू नये. लहान मुलांना एकटे फिरू न देणे, जनावरांना बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यामध्ये बांधावे. तसेच बिबट्या आढळून आल्यास त्वरित स्थानिक प्रशासनास कळवावे. कोणीही बिबट्याचा पाठलाग करू नये. कोणत्याही अफवा पसरवू नयेत, असे करणे कायद्याने गुन्हा असून अफवा पसरविल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर कार्यवाही होवू शकते. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, वन विभाग आणि पोलीस विभागाची पथके शहरात व परिसरात रात्री गस्त घालणार आहेत, असे स्थानिक प्रशासन, वन विभाग व पोलीस प्रशासनाने कळविले आहे.