शिक्षक कुटूंबातील तिघांची रेल्वेखाली आत्महत्या
गंगाखेड येथील हदयद्रावक घटना; घटनेमागचे कारण अस्पष्ट
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील किन्नी कदू येथील एका शिक्षकाने गुरुवारी टोकाचे पाऊल उचलले. दुपारी अडीचच्या सुमारास शिक्षकाने आपल्या कुटुंबासह स्वत:ला रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. तिघांच्याही मृतदेहावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
गुरुवारी गंगाखेड शहरालगत असलेल्या धारखेड परिसरात शिक्षकाने कुटुंबासह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मसनाजी तुडमे (वय – 53) या शिक्षकाने पत्नी रंजना मसनाजी तुडमे (वय – 35), मुलगी अंजली तुडमे (वय – 22) यांच्यासह रेल्वे खाली उडी घेतली. गोदावरी नदी पुलाच्या रेल्वे ट्रॅकवर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.
मसनाजी सुभाष तुडमे गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी पत्नी आणि मुलीसह परळीकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या रेल्वेखाली आत्महत्या केली. तिघांचेही मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आले. शुक्रवारी तिघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
तिघांना मुखाग्नी देताना ग्रामस्थांनी डोळ्यातील आसवांना वाट करुन दिली. गेल्या वर्षीच मसनाजी तुडमे यांच्या जावायाचे अपघाती निधन झाले होते. अवघ्या वर्षभरात त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.