अवैध धंदे विरोधी पथकाचे उत्कृष्ट काम !! शोधून काढले घरातच बनवलेले गुटख्याचे गोदाम !!
अवैध धंदे विरोधी पथकाचे उत्कृष्ट काम !! शोधून काढले घरातच बनवलेले गुटख्याचे गोदाम !!
उदगीर ( एल.पी.उगीले) : महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा या चार राज्याच्या सीमा भागात असलेल्या उदगीर शहराला आता अवैध धंद्याचे माहेरघर बनवण्याचा उद्योग सुरू आहे की काय? अशी शंका यावी, इतपत अवैध धंद्यांनी या शहराला चहूबाजूने घेरले आहे. ग्रामीण भागामध्ये मटका, गुटखा, जुगार हे सर्रास चालू आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी प्रामाणिकपणे हे अवैध धंदे बंद व्हावेत, यासाठी प्रयत्न चालवले आहेत. मात्र दुर्दैवाने स्थानिक पोलीस अवैध धंदेवाल्याच्या मांडीला मांडी लावून बसत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या आशा, अपेक्षा धुळीस मिळत आहेत.
या गोष्टीकडे बारकाईने विचार करून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील तरुण आणि तडफदार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथके बनवून वेगवेगळ्या भागांमध्ये अशा अवैध धंद्यावर धाडी टाकण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र कित्येक वेळा “घर का भेदी, लंका ढाये” म्हणतात, त्या पद्धतीने बऱ्याच वेळा या विशेष पथकाच्या धाडी पूर्वीच अवैध धंदेवाल्यांना त्याची टीप कुणीतरी झारीतला शुक्राचार्य देतोय की काय? अशी शंका येण्यासारख्या देखील बऱ्याच घटना घडू लागल्या आहेत.
उदगीर तालुक्यातील उदगीर शहर, उदगीर ग्रामीण आणि वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सध्या अवैध दारू सोबत मटका, गुटखा आणि जुगार असे अवैध धंदे बाळसे धरू लागले आहेत. नाही म्हटले तरी मध्यंतरीच्या काळात आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांनी काही ठिकाणी धाडी घालून वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी पाठ फिरवली की पुन्हा स्थानिक पोलिसांचे वसुली कर्मचारी त्या अवैध धंदेवाल्यांना बळ देत आहेत की काय? अशीही चर्चा आता सुरू झाली आहे. कित्येक अवैध धंद्याच्या ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचारी आढळून येऊ लागल्याची चर्चा राजरोसपणे होत आहे.
उदगीर शहरात तर गुटख्याचे गोदामच्या गोदाम असल्याची चर्चा गुटखा बहाद्दर सतत करत असतात.
महाराष्ट्र शासनाने तरुणांच्या आरोग्याचा विचार करून रसायन मिश्रित सुगंधी तंबाखू आणि गुटखा प्रतिबंधित केला. असे असले तरीही चिरीमिरीच्या लालसेने इतर राज्यातून तोगरी मार्गे उदगीर कडे हे सर्व अवैध धंदे हळूहळू पसरू लागले आहेत. कित्येक ठिकाणी तर पोलिसांनी त्यांना आधार दिल्याचेही चर्चा चालू आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी वेगवेगळ्या भागासाठी विशेष पथके निर्माण केली आहेत. आता या पथकांच्या मार्फत अशा अवैध धंद्यावर धाडी घालण्याची मोहीम सुरू झाली आहे.
पूर्वी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे उत्कृष्ट कार्य केलेले पोलीस उपनिरीक्षक आनंद नामदेव श्रीमंगल हे सध्या अहमदपूर पोलीस स्टेशन येथे जरी कार्यरत असले तरी ते अवैध धंदे विरोधी पथक क्रमांक दोन मध्ये सक्रिय असल्यामुळे त्यांनी या भागाची माहिती घेऊन रविवारी उदगीर शहराच्या मध्यभागी असलेल्या एका घरातून गुटख्याचे पूडकेच्या पुडके कार मध्ये भरून चोरटी वाहतूक करण्याच्या तयारीत असताना, धाड टाकून गुटका आणि त्याची वाहतूक करण्यासाठी वापरात येणारी कार असा एकूण सहा लाख 25 हजार 365 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे 319 /24 कलम 123,223, 274,275 बी एन एस सह कलम 59 अन्नसुरक्षा व मानके अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपी सिद्धेश्वर उर्फ पंतू बाबुराव भालके (रा. अशोक नगर, उदगीर) यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणी विमल पान मसाला एकूण नग ५५० पुडे, प्रत्येकी किंमत 120 प्रमाणे एकूण 66 हजार रुपये, तसेच v1 तंबाखू एकूण नग 810 प्रति नग किंमत 30 प्रमाणे एकूण किंमत 24300 रुपये,तसेच विमल पान मसाला किंग एकूण 22 नग प्रति नग किंमत 200 रुपये एकूण किंमत 4400 रुपये, तसेच आर एम डी पान मसाला छोटा बॉक्स एकूण नग सहा प्रती नग किंमत सहाशे रुपये एकूण किंमत 3600 रुपये, तसेच रजनीगंधा पान मसाला छोटी पुडी 784 प्रति नग किंमत दहा रुपये प्रमाणे एकूण किंमत 7840 रुपये, तसेच सागर पान मसाला 40 पुडे प्रती नग किंमत 105 रुपये प्रमाणे 4200 रुपये, एस आर वन तंबाखू चाळीस पुडे प्रति नग किंमत सत्तर रुपये प्रमाणे 2800 रुपये, गीतांजली पान मसाला 25 पुडे प्रती नग किंमत 120 रुपये प्रमाणे एकूण तीन हजार रुपये, तसेच G 1 तंबाखू 25 पुडे प्रती नग किंमत पंधरा रुपये प्रमाणे एकूण 375 रुपये, बाबा 120 चे 10 पुडे प्रती नग किंमत 450 रुपये प्रमाणे एकूण 4500 रुपये, पानबहारचे पाच पुडे प्रती नग किंमत 150 रुपये प्रमाणे एकूण 750 रुपये आणि हा सर्व माल घेऊन जाण्यासाठी वापरण्यात येत असलेली जुनी वापरात असलेली स्विफ्ट डिझायर पांढऱ्या रंगाची कार तिचा नंबर एम एच 12 केजे 27 17 किंमत अंदाजे पाच लाख रुपये असा एकूण सहा लाख 25 हजार 365 जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांनी केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
उदगीर शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला जातो, तसेच सरास विक्री केला जातो. तरी देखील स्थानिक पोलीस काहीच का करत नसतील? या संदर्भामध्ये शहरात उलट सुलट चर्चा चालू असून काही चौकात तर पोलीसच गुटखा खात असल्याचेही बोलले जात आहे. एकंदरीत अशा पद्धतीच्या अवैध धंद्याला नेमके कुणाचे पाठबळ आहे? या संदर्भातही चर्चेला उधाण येऊ लागले आहे.
चौकट…….
सर्व अवैध धंदे ग्रामीण हद्दीतूनच……
उदगीर शहरात जरी अवैध गुटख्याचे गोदाम बनलेले दिसत असले तरी ही सर्व आवक ग्रामीण हद्दीतूनच उदगीर शहरात येते, म्हणजेच प्राधान्याने देवणी पोलीस स्टेशन, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन आणि वाढवणा पोलीस स्टेशन या भागात या साठवणूक झालेल्या अवैध गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. आणि या अवैध वाहतुकीला आणि विक्रीला पर्यायाने देवणी, वाढवणा, उदगीर ग्रामीण या पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी देखील काही अंशी कारणीभूत ठरू शकतात अशी चर्चा चालू आहे. काही ठिकाणी तर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी हप्ते वसुलीसाठी जात असल्याचेही बोलले जात आहे म्हणजेच रक्षकच भक्षक होत असल्याची चर्चाही ग्रामीण हद्दीत चालू आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेच्या विरोधात जाण्याची हिंमत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी का करत आहेत हे देखील एक न उलगडणारे कोडे आहे. स्थानिक पोलिसांनी जर निर्धार केला तर अशा अवैध धंद्याला कुठेही थारा मिळू शकत नाही. मात्र स्थानिक पोलिसांच्याच ठिकाणी पाणी मुरत असल्याने हे धंदे बोकाळू लागले आहेत विशेष पथकाने ज्या हद्दीमध्ये धाड टाकून मुद्देमाल जप्त केला असेल त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारींना वरिष्ठांनी जाब विचारायला सुरुवात केली तर कदाचित काही प्रमाणात प्रतिबंध होऊ शकेल असेही काही जाणकार बोलत आहेत.
चौकट……
गुटखा पाठोपाठ मटकाही पाय पसरतोय……
मध्यंतरीच्या काळात गल्लोगल्ली बस्तान बसवलेल्या मटक्याला काही प्रमाणात हद्दपार करण्यात विशेष पथकांना यश आले होते. मात्र पुन्हा कर्नाटक मार्गे आणि देगलूर मार्गे मटका उदगीर शहरात आणि ग्रामीण हद्दीमध्ये पाय पसरू लागला आहे या मटक्यामुळे गोरगरिबाचे संसार उध्वस्त होत आहेत असे असले तरीही पोलीस प्रशासनातील काही वसुली बहाद्दर या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याने मटक्याचे बस्तान बसू लागले आहे. या सदर्भातही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपल्या विशेष पथकाला सूचना करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
चौकट……
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाला कळते, स्थानिक पोलिसांना कसे काय कळत नाही?
जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला अनेक ठिकाणी अवैध धंदे चालू असल्याचे समजू लागले आहे. आणि त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षकाच्या सूचनेवरून विशेष पथक त्या ठिकाणी धाडी घालू लागले आहे. मग त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांना या अवैध धंद्याचा थांग पत्ता लागला नाही का? किंवा त्यांना खरंच हे अवैध धंदे माहिती नव्हते, असे म्हणता येईल का? जी गोष्ट 65 ते 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस विशेष पथकाला माहिती होते, ती गोष्ट त्या त्या भागातील स्थानिक पोलिसांना कशी समजत नाही? असा कुतूहलाचा प्रश्न जनता उपस्थित करू लागली आहे.
चौकट…..
काही अधिकाऱ्यांची चमकोगिरी……
वरिष्ठ अधिकाऱ्याकडून किंवा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून धाडी पडण्याची शक्यता लक्षात येताच, काही अधिकारी चमकोगिरी करत आमच्या भागात लपून-छपून चालू असलेले अवैध धंदे आम्ही बंद करत आहोत. असे दाखवण्यासाठी थातूरमातूर कारवाई करून आम्ही फार कर्तव्यदक्ष आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्या परिसरातील जनतेकडून होत असलेली अवैध धंद्याच्या विरोधातली ओरड जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत किंवा जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेपर्यंत पोहोचू लागली आहे. नाहीतर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाकडून त्या त्या ठिकाणी धाडीही पडू लागले आहेत. त्यामुळे अशा चमकोगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता फारसा थारा मिळणार नसल्याचेही बोलले जात आहे.
