बौद्धिक कृत्रिमतेचा उपयोग भौगोलिक क्षेत्रात आवश्यक – डॉ. परमेश्वर लोहकरे

0
बौद्धिक कृत्रिमतेचा उपयोग भौगोलिक क्षेत्रात आवश्यक - डॉ. परमेश्वर लोहकरे

बौद्धिक कृत्रिमतेचा उपयोग भौगोलिक क्षेत्रात आवश्यक - डॉ. परमेश्वर लोहकरे

अहमदपूर (गोविंद काळे) : सध्याचा काळ हा विज्ञान तंत्रज्ञानाचा असून या काळामध्ये भूगोलामध्ये पारंपारिक पद्धती ऐवजी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन प्रा.डॉ. परमेश्वर लोहकरे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या आय. क्यू. ए. सी. विभाग अंतर्गत भूगोल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘भूगोल दिन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर कर्मयोगी तुळशीराम महाविद्यालय हडोळती येथील भूगोल विभागातील डॉ. परमेश्वर लोहकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तर उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एन. माने यांची किसान पीठावर प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलतांना डॉ. लोहकरे म्हणाले की, मानवी जीवनाच्या विकासाचा अभ्यास भूगोल या विषयांमध्ये केला जातो भूगोलाचा संबंध कृषी, उद्योग, विज्ञान आदी क्षेत्राशी आहे, असे ही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, प्रत्येक विषयात भूगोल आणि भूगोलात सर्व विषय समाविष्ट आहेत. साहित्य, समाज, संस्कृती, कला, इतिहास, राज्यशास्त्र, विज्ञान, गणित आणि वाणिज्य या विविध क्षेत्राशी भूगोलाचा संबंध येतो. कारण या विषयाचा केंद्रबिंदू हा मानव आहे तसेच भूगोलामध्ये पंचतत्वातून निर्माण झालेल्या सृष्टीचा अभ्यास केला जातो. त्याचबरोबर ऋतुचक्रांचाही अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. या बरोबरच मनुष्य भूगोलाचा केंद्रबिंदू असल्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा सर्वांगीण दृष्टीने अभ्यास भूगोल या विषयाच्या माध्यमातून केला जातो असे ही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य कै. नामदेवराव चामले मामा यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘वसुंधरा’ या भितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले व प्रतिवर्षी भूगोल दिन हा भूगोल तज्ज्ञ सी.डी.देशमुख यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून मकर संक्रांतीच्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी तिळगुळाचे वाटपही करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय भूगोल विभाग प्रमुख डॉ. डी. एन. माने यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. मारोती कसाब यांनी केले तर आभार डॉ. सचिन गर्जे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!