मानवाच्या जीवनाचा दर्जा पर्यावरणावर अवलंबून – प्रा. डॉ. जीवण गंगणे
मानवाच्या जीवनाचा दर्जा पर्यावरणावर अवलंबून - प्रा. डॉ. जीवण गंगणे
सताळा (एल.पी.उगीले) : हवा खराब असेल तर मानवी जीवन धोक्यात येते. हवेचा दर्जा हाच मानवी जीवनाचा दर्जा ठरवत असतो . म्हणूनच खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचा दर्जा हा शुद्ध हवेवर अवलंबून आहे, असे मत स्वामी विवेकानंद महाविद्यालय, शिरूर ताजबंद येथील लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा. डॉ. जीवन गंगणे यांनी व्यक्त केले. ते मौजे सताळा येथे आयोजित महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीरच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर चे राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर मौजे सताळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी चालू आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनंदा भद्रशट्टे या होत्या. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. बालाजी होकरणे , डॉ. निळकंठ वगशेट्टे, प्रा. संजय बिबीनवरे आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ . गंगणे म्हणाले की, प्लास्टिक कचरा मुक्त भारत अभियान राबवून पर्यावरणाचे संवर्धन आपण करू शकतो. यामुळे समाजात पर्यावरण संरक्षणाचे कार्य करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी सर्वांनी घेतली तरच हे कार्य व्यवस्थितपणे होऊ शकते, अन्यथा पृथ्वीच्या ऱ्हासाला कोणीही रोखू शकणार नाही. याची जाणीव ठेवून प्रत्येकाने ज्या पृथ्वीने आपणाला कवेत घेतले आहे, त्या पृथ्वीला वाचविण्याची शपथ घेतली पाहिजे. पर्यावरणाच्या ऱ्हासाला जे घटक कारणीभूत आहेत म्हणजेच प्लास्टिक आणि इतर घातक गोष्टींना आपण दूर करून समृद्ध पर्यावरण आणि समृद्ध पृथ्वी निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत राहावे, असे मत व्यक्त केले .पर्यावरण संवर्धनासाठी आपण आपल्या घरापासून कशा पद्धतीने हातभार लावू शकतो, याची उकल आपल्या प्रात्यक्षिक प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर केली. अध्यक्षीय समारोप करताना डॉ .सुनंदा भद्रशेट्टे म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्र भावना निर्माण करण्यासाठी तसेच राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी आवश्यक आहे. महाविद्यालयीन जीवन जगत असताना आपल्यामध्ये राष्ट्राबद्दल सकारात्मक विचार रुजविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करत असते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे काही उद्दिष्ट असतात ते सफल होण्यासाठीच आपण वेगवेगळ्या गावांमध्ये शिबिराच्या माध्यमातून श्रमसंस्कार करत असतो, असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय ‘रासेयो’ कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होकरणे यांनी करून दिला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु. वैष्णवी वनमारे यांनी केले .
