कठोर परिश्रमातूनच यशाचे शिखर गाठता येते – तहसीलदार राम बोरगावकर

0
कठोर परिश्रमातूनच यशाचे शिखर गाठता येते - तहसीलदार राम बोरगावकर

कठोर परिश्रमातूनच यशाचे शिखर गाठता येते - तहसीलदार राम बोरगावकर

सताळा : (एल.पी.उगीले) : आयुष्यामध्ये यश संपादन करण्याकरिता कठोर परिश्रमाला पर्याय नाही. सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच इच्छित ध्येय साध्य करता येते. केवळ पदवी संपादन करण्यापेक्षा विविध व्यक्तिमत्व विकासाच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व कठोर परिश्रमातून यशाचे शिखर गाठावे, असे मत उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके हे होते. यावेळी व्यासपीठावर सहसचिव अँड. एस. टी. पाटील चिघळीकर , विभागीय समन्वयक प्रा. डॉ. कांत जाधव, डॉ. आर. एस. धनेश्वर, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, वाघम्बर तिरकोळे, उपसरपंच सचिन सुडे, ग्राम विकास अधिकारी व्यंकटराव लोणीकर, गुणवंत बिरगे यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना तहसीलदार राम बोरगावकर म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून आयुष्यभर वर्तन करावे. ग्राम उद्धारासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेचे पारायण प्रत्येक विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. तरुणांनी मोठी स्वप्न पहावीत व कठोर परिश्रमांनी ती मूर्त रूपात साकार करावीत, असे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. विभागीय समन्वयक प्रा. डॉ. कांत जाधव म्हणाले, विद्यार्थी व गाव यांच्या समन्वयातूनच विकासाची दृष्टी प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी श्रमाची प्रतिष्ठा राखावी, यासाठीच राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले जात असते. सहसचिव अँड. पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे माझ्यासाठी नव्हे तर सर्वांसाठी. ‘मी’ पासून ‘आम्ही’ पर्यंतचा प्रवास राष्ट्रीय सेवा योजनेतून झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना सचिव रामचंद्र तिरके म्हणाले, शिस्त, सेवा व समर्पणाची जाणीव राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून जागृत होते. शिबिर संपले तरी शिबिरातून झालेले श्रमसंस्कार विद्यार्थ्यांनी आयुष्यभर जोपासावेत. वर्तन बदलाचे संस्कार राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातून होत असतात. राष्ट्रीय विकासात युवकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी तर शिबिराच्या अहवालाचे वाचन कार्यक्रमाधिकारी डॉ सुनंदा भद्रशेट्टे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी फड व साक्षी शेवाळे यांनी तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. बालाजी होकरणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ. निळकंठ वगशेट्टे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!