ढाळेगांव येथील 4200 कुकूट पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळे नाही तर इतर कारणामुळे – पशुसंवर्धन विभाग लातूर
ढाळेगांव येथील 4200 कुकूट पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू मुळे नाही तर इतर कारणामुळे - पशुसंवर्धन विभाग लातूर
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील ढाळेगाव येथील भागीरथी पोल्ट्री फार्म येथील ४२०५ कुक्कुट पक्षी १६ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान मेल्याने बर्ड फ्ल्यू या आजाराचा लातूर जिल्ह्यातील उदगीर पाठोपाठ अहमदपूर तालुक्यात शिरकाव झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या व जिल्हा पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवर आल्याचे दिसून आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव येथील सचिन अशोक गुळवे यांचा मागील पंधरा वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसाय आहे त्यांच्याच शेतात कुक्कुटपालनचे किमान दहा हजार क्षमतेचे वातानुकूलित दोन शेड असून दिनांक १५ जानेवारी रोजी व्यंकटेश्वरा हॅचरीचे ४००० पक्षी आणले होते, हे पोल्ट्री फार्म ग्रामीण भागात असल्याकारणाने नेहमीच विजेचा लपंडाव चालत असतो आणि त्या दिवशीही नेमकं तेच घडले दिनांक १६ जानेवारी रोजी रात्री बारा ते दोन या दम्यान दोन तास वीज गेली आणि त्या दिवशी थंडीचे प्रमाणही अधिक असल्याने हे सर्व पक्षी शेडमध्ये एका कोपऱ्यात एकत्र जमा झाले व एकमेकांवर चढून बसले खालील पिल्यांचा गुदमरून व भीतीने १६ जानेवारी रोजी १५० पक्षांचा मृत्यू झाला त्या फोटो पाठ १८ जानेवारी रोजी ८००, तर १८ जानेवारी रोजी १०००, पुढे १९ जानेवारी रोजी २००,२० जानेवारी रोजी पुन्हा २००,२१ जानेवारी रोजी ५०,२२जानेवारी रोजी १८०० तर २३जानेवारी रोजी ०५ असे एकूण ४२०५ पक्षांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज सदरील पोल्ट्री फार्मचे मालक सचिन गुळवे व पशुसंवर्धन विभागाने वर्तविला आहे. हे मृत्यूचे प्रमाण असाधारण असल्याने सचिन गुळवे यांनी व्यंकटेश्वरा हॅचरीजच्या अधिकारी यांना फोन द्वारे कळविले असता त्यांनी त्या मृत पक्षांची विल्हेवाट लावण्याचे सांगितले असता सचिन गुळवे यांनी जमिनीत खोल खड्डा करून त्यात चुना इत्यादी साहित्य टाकून मृत पक्षांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली. आज दिनांक २३ रोजी पशुसंवर्धन विभागाची टीम घटनास्थळी हजर राहून सदरील शेडची पाहणी करून सविस्तर माहिती जाणून घेऊण मृत पक्षांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून दिले व त्याबरोबरच खाद्य नमुने हे तपासणीसाठी पाठवून दिले या पथकात पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. . बोधनकर , सहाय्यक आयुक्त अहमदपूरचे डॉ. शिवाजी क्षीरसागर, पंचायत समिती अहमदपूरचे पशुधन विकास अधिकारी डॉ. सुयोग येरोळे, व पशुवैद्यकीय दवाखाना अंधेरी येथील डॉ. श्रीराम गायकवाड यांचा समावेश होता त्याचबरोबर जिल्हा पशुसंवर्धन लातूरचे उपायुक्त डॉ.एस. जी. शिंदे यांनीही घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून खाद्य व मृत पक्षांचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवून दिले.
