ट्रॅव्हल्स व दुचाकीचा अपघात, दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी….!
ट्रॅव्हल्स व दुचाकीचा अपघात, दुचाकी वरील दोघे गंभीर जखमी….!
अहमदपूर ( गोविंद काळे) : दि.२४ जाने.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील बाह्य वळण रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याने आता राष्ट्रीय महामार्गाकडून बाह्य वळण रस्त्यावर योग्य त्या तांत्रिक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
आज दि. २४ जाने. रोजी अहमदपूर शहरा लगत असलेल्या तात्या पेट्रोल पंपाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ बाह्य वळण रस्त्यावर सकाळी साधारणतः०९:०० वा. दुचाकी व ट्रॅव्हलचा अपघात होऊन मोटरसायकल वरील एक महिला व एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीवरून शर्मा टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची एम पी ०९ डि डब्ल्यू ८९३० क्रमांकाची बस (नांदेड – लातूर – बेंगलोर ) हि लातूरहून नांदेड कडे जात असताना अहमदपूर शहराजवळील बायपास वळण रस्त्यावरून एम एच ०१ ए एस ४०७१ क्रमांकाच्या मोटरसायकल वरून दोघेजण नामे १.सचिन वेंकटेश कांडणगिरे वय वर्ष २८ राहणार चिखली तालुका अहमदपूर व २.सुषमा सचिन कोटलपुरे वय वर्षे ४५ राहणार चिखली हे लातूरच्या दिशेने निघाले असता सदरील बस व मोटरसायकलचा समोरासमोर अपघात झाला. उपस्थितांनी जखमी मोटरसायकल स्वारांना अहमदपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व या घटनेची माहिती अहमदपूर पोलिसांना कळविली असता पोलीस उपनिरीक्षक दिंडगे व त्यांचे सहाय्यक पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. त्यांनी अपघात ग्रस्त ट्रॅव्हल्स व दुचाकी रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करून दिली व सदरील ट्रॅव्हल्स व तिचा चालक यांना अहमदपूर पोलीस ठाण्यात पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेले. अपघातातील जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात पाठवल्याची माहिती संबंधित डॉक्टरांनी दिली. या घटनेची पुढील कारवाई अहमदपूर पोलीस स्टेशनला सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आली.
