पशुसखींनी कार्यकर्तुत्वातून ओळख निर्माण करावा – प्रा. डॉ. नंदकुमार गायकवाड
बीडच्या पशुसखी प्रशिक्षणाचा समारोप
उदगीर (एल.पी.उगीले) : शेळीपालन पारंपरिक पद्धतीने न करता, प्रशिक्षित पशुसखी महिलांनी त्यास उद्योगाचे स्वरूप द्यावे. आत्मसात केलेल्या माहितीचा उपयोग करून अधिक अर्थप्राप्ती करावी. प्राप्त केलेले ज्ञान इतर शेळीपालकां पर्यंत पोहोचवावे. प्रगतशील शेळीपालक आणि क्षेत्रीय माहिती प्रसारक म्हणून एक ओळख पशुसखींनी जनमानसात स्वकर्तुत्वातून निर्माण करावी. असे आवाहन प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा.डॉ.नंदकुमार गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
माफसु, नागपूर आणि माविम, मुंबई यांच्यातील सामंजस्य करारानुसार उदगीर पशुवैद्यक महाविद्यालयात बीड जिल्ह्यातील २१ पशुसखीकरीता निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. समारोप प्रसंगी मंचावर बीड जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर, प्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख, प्रकल्प सह-समन्वयक डॉ. नरेन्द्र खोडे, प्रशिक्षण समन्वयक डॉ. शरद आव्हाड , प्रशिक्षण सह-समन्वयक डॉ. मत्स्यगंधा पाटील, आणि डॉ. राम कुलकर्णी हे उपस्थित होते.
प्रास्ताविक डॉ. शरद आव्हाड यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सुहासिनी हजारे यांनी केले. पाच दिवसीय प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या पशुसखींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रसंगी डॉ. धनंजय देशमुख यांनी प्रशिक्षणाचे प्रचार आणि प्रसारातील महत्व अधोरेखित केले. जिल्हा समन्वय अधिकारी सुखदेव चिंचोलीकर यांनी माविमतर्फे भविष्यात पशुसखींकरिता राबविण्यात येणाऱ्या योजनावर प्रकाश टाकला.
संवाद कौशल्य, उद्यमिता निर्मिती, विविध विस्तार कौशल्यासोबत आदर्श शेळीसंगोपन, मुल्यवर्धित पदार्थ निर्मिती, प्राथमिक उपचार यावर भर टाकणारे हे प्रशिक्षण श्रुंखलेतील उदगीर पशुवैद्यक महाविद्यालयात आयोजित होणारे दुसऱ्या टप्प्यातील चौथे प्रशिक्षण होते. माया खरात आणि रेखा वेडे या पशुसखींनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करतांना प्रशिक्षण त्यांच्या उपजिविकेत मैलाचा दगड ठरेल असा आत्मविश्वास व्यक्त केला. आभार प्रदर्शन डॉ. संकेत नरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. वेदांत पांडे, डॉ. अय्यान पाटील, व विस्तार शिक्षण विभागातील कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली.