परीक्षा केंद्रासाठी इतर संस्थेतील कर्मचारी नियुक्तीचा निर्णय रद्द करा शिक्षण संस्थाचालक संघाची मागणी
उदगीर (एल.पी.उगीले) : इयत्ता १० वी व १२ वी परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक व परीक्षेशी संबंधित व्यक्तिची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याचा निर्णय रद्द करावा.अशी मागणी लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
इयत्ता १०वी व १२ वी परीक्षा केंद्रासाठी केंद्र संचालक व परीक्षेशी संबंधित व्यक्तीची नियुक्ती सदर केंद्राव्यतिरिक्त इतर शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.एका परीक्षा केंद्रावरून दुसर्या परीक्षा केंद्रावर कर्मचाऱ्यांची आदला बदल करण्याचा हा निर्णय व्यवहार्य नाही.परीक्षेच्या दिवसी शाळेमध्ये इतर वर्ग कोणी घ्यायचे,हा प्रश्न या निर्णयावरून उपस्थित होत आहे.या निर्णयाचा इयत्ता ८ वी,९ वी व ११ वी च्या अध्यापनावर परिणाम होणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा केंद्रासाठी इतर संस्थेतील कर्मचारी नियुक्तीचा निर्णय रद्द करावा,अशी मागणी लातूर जिल्हा शिक्षण संस्थाचालक संघाच्यावतीने शिक्षण मंडळाचे लातूर विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर अध्यक्ष रामदास पवार,उपाध्यक्ष जे.जी. सगरे, कोषाध्यक्ष प्राचार्य डी.एन.केंद्रे,सचिव बाबुराव जाधव,मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशमुख यांच्या स्वाक्षरी आहेत.