पक्षपाती भूमिका बाळगणाऱ्या निवडणूक आयोगाचा काँग्रेसकडून निषेध
पक्षपाती भूमिका बाळगणाऱ्या निवडणूक आयोगाचा काँग्रेसकडून निषेध
उदगीर (एल. पी. उगिले) : निवडणूक आयोगाच्या वतीने मागील निवडणुकीच्या दरम्यान चुकीची भूमिका घेतल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोगाचा जाहीर निषेध करणारे निवेदन तहसीलदार उदगीर यांना देण्यात आले आहे. सदरील निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याच्या अधिकार दिले आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अन्यन्य साधारण महत्व आहे. देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणातीपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. आणि निवडणुकीत मतदार हा राजा असतो, परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वासनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजप युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते. व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास असणार नाही. मतदार यादी मध्ये घोटाळा करण्यात आला. या विरोधात मोठी ओरड होऊनही निवडणूक आयोगाने तक्रार कडे दुर्लक्ष केले. त्यानंतर निवडणूक निकालात घोटाळा करण्यात आला.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल 50 लाख मतांची वाढ कशी झाली? मतदानाचे दिवशी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी, यामध्ये मोठी तफावत आहे. यातही 76 लाख मतदान वाढलेले दाखवले आहे.
सर्व मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था होती.
त्यामुळे मतदार यादीतील घोळ रात्रीच्या अंधारात वाढलेले 76 लाख मतदान याचे पुरावे निवडणूक आयोगाने द्यावेत, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असताना आजपर्यंत ही माहिती देण्यात आलेली नाही.
राज्यातील मतदारांचाही विधानसभेच्या निकालावर विश्वास बसलेला नाही. आपले मतदान चोरले गेल्याची भावना जनतेत आहे. जनतेची ही भावना महत्त्वाची आहे. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या दिवसाच्या औचित्य साधून काँग्रेस पक्ष निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पडदापाश करत आहे. निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा न करता, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक घेण्याचे आपले कर्तव्य पार पाडावे. तसेच लोकशाहीचे रक्षण आणि मतदारांचा आदर, सन्मान तसेच विश्वास कायम ठेवून विश्वासार्हता अबाधित राहील, याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे. अशी विनंती ही सदरील निवेदनात करण्यात आली आहे.
सदरील निवेदनावर काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव हुडे , संचालक संतोष बिरादार, चंद्रप्रकाश खटके, समशुद्दीन झरगर, ज्ञानोबा गोडभरले, विवेक पंडितराव जाधव, आदर्श पिंपरे, महबूब शेख, श्रीनिवास एकुरकेकर, अनिष्क शिंदे, हनुमंत माने, सद्दाम बागवान, बबन धनबा, माधव कांबळे, अर्जुन जाधव, प्रीतम गोखले इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
