यशासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे – उपजिल्हाधिकारी डॉ. मंजुषा लटपटे
अहमदपूर (गोविंद काळे) : सध्याच्या काळात विविध क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे. त्याकरिता प्रयत्नाचे सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे नि:संदिग्ध प्रतिपादन अहमदपूर चाकूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय विशेष निवासी शिबिर मौजे हासर्णी येथे आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर हे होते तर विचार मंचावर उद्घाटक उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. शिंदे यांची विशेष उपस्थिती होती तर प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, डॉ. नामदेव गौंड यांच्यासह सरपंच सौ वैशाली करे , उपसरपंच बालाजी राऊतराव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानोबा तिडोळे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख शादुल्ला, तंटामुक्तीचे अध्यक्ष विलासराव राऊतराव, चेअरमन व्यंकटी गौंड, ग्रामपंचायत सदस्य गजानन गंगथडे,चंद्रकांत पवार,मुद्रिकाबाई गव्हाळे, पोलीस पाटील गिरजाप्पा परीट, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी प्रतिनिधी ऋतुजा देशमुख, अनिता नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटन कार्यक्रमाच्या उदघाटीकीय भाषणाप्रसंगी डॉ. मंजुषा लटपटे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनो ! स्वावलंबी बना, घराला स्वावलंबी बनवा,गाव स्वावलंबी बनवा, तेव्हाच समाज स्वावलंबी बनेल. याकरिता स्वतःच्या विकासा सोबतच समाजाच्या आणि राष्ट्राच्या विकासाची ही ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे, असे ही त्या म्हणाल्या.
उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी आपल्या मनोगतातून म्हटले की, गावच्या विकासाला नवी दिशा देण्याचे कार्य आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक निश्चित करतील, असा आशावाद व्यक्त केला. तसेच हसर्णी हे गाव तालुक्यातच नव्हे तर राज्यामध्ये आदर्श गाव म्हणून नावा रूपाला येईल असे ही ते म्हणाले. याप्रसंगी चेअरमन व्यंकटी गौंड, प्रा. डॉ. नामदेव गौंड यांनी ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी महात्मा फुले महाविद्यालयास २५ वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल रौप्य महोत्सवी वर्षाचा लोगो चे विवेचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल माजी कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी तर सूत्रसंचालन ह. भ. प. प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांनी व आभार उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचार, ग्रामस्थ, स्वयंसेवक विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.