मोंढा परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे – सभापती प्रीती भोसले

0
मोंढा परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे - सभापती प्रीती भोसले

मोंढा परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे - सभापती प्रीती भोसले

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये आपल्या आडत दुकानाच्या वरच्या मजल्यावर काही व्यापारी बांधवांनी निवास व्यवस्था केलेली आहे. काही व्यापारी बांधव आरोग्य आणि स्वच्छता या विषयाकडे नजर अंदाज करून परिसर घाण करत आहेत, परिणामतः घरातील ओला कचरा, सुका कचरा याचे वर्गीकरण न करता, पाठभिंती असलेल्या दोन रांगेच्या मध्ये असलेल्या बोळामध्ये कचरा टाकून परिसर अस्वच्छ करत आहेत. परिणामतः या भागातून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकासह मोंढा परिसरातील व्यापारी, हमाल, मापाडी आणि शेतीमाल खरेदी विक्रीच्या निमित्ताने आलेले शेतकरी यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. अशा अस्वच्छतेमुळे भविष्यामध्ये साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन सर्व व्यापाऱ्यांना स्वच्छता पाळण्याचे निर्देश उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आले आहेत. अशी माहिती उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मोंढा परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांनी सामाजिक जाणीवा जपाव्यात. आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, तसेच इतरही समाजातील नागरिकांना या अस्वच्छतेचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्वच्छतेसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील सर्वांचे आरोग्य सांभाळले जावे. यादृष्टीने कृषी उत्पन्न बाजार समिती प्रयत्न करतच आहे. सर्वांनी या प्रयत्नांना सहकार्य करावे. असेही आवाहन सभापती प्रीती चंद्रशेखर भोसले यांनी केले आहे.
उदगीर शहरातील व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. व्यापारी बांधवही सहकार्य करत आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत काही व्यापारी बांधवांमुळे संपूर्ण मोंढा परिसर अस्वच्छ असल्याची टीका केली जात आहे. या गोष्टीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. बाजार समिती तर प्रयत्न करतच आहे व्यापाऱ्यांनीही सहकार्य करावे असे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *