मारोती तांड्याला रस्ता करून द्यावा,अन्यथा आमरण उपोषण नागरिकांचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील नागलगाव मारोती तांड्याना रस्ता करून द्यावा. अन्यथा येत्या सात फेब्रुवारी रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू. असे निवेदन उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आले आहे, मारोती तांड्याला भारत स्वातंत्र्य काळापासून रस्ताच नसल्याने नागरिकांना आजही मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागले आहे,मारोती तांड्याना रस्ता करून द्यावा, म्हणून प्रशासनाकडे हजारो वेळा मागणी केली, परंतु आजपर्यंत तांडा हा रस्त्यापासून वंचित राहिला आहे, तांड्यात जिल्हा परिषदेची शाळा असून शाळेत शिकविण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांना दोन किलोमीटर पर्यंत पायी चालत शाळेत जावे लागते,पावसाळ्यात तर तांड्यात जाणे देखील कठीण आहे,रस्त्या अभावी अनेकांना प्राणास मुकावे लागले, गरोदर मातेच्या ही हाल अपेष्टा सांगणेही कठीण आहे,मारोती तांड्याला रस्ता करावा या मागणीसाठी लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांनी ११ फेब्रुवारी २०२१ रोजी तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसून आत्मदहनाचा इशारा दिला होता,उपोषणस्थळी राज्याचे तत्कालीन कॅबिनेट मंत्री तथा उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी भेट देवून मारोती तांड्याला रस्ता करून देऊ. असे आश्वासन देत १३ फेब्रुवारी २०२१ रोजी लक्ष्मीकांत पाटील कौळखेडकर यांचे उपोषण मागे घेण्यास लावले.परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारे मारोती तांड्याच्या रस्त्याच्या बाबतीत प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही,पिंपरी ते नागलगाव जाणारा शासकीय नकाशावरील पाणंद रस्ताही प्रशासनाने खुला करून दिला तर मारोती तांड्यातील नागरिकांना या पाणंद रस्त्याचा उपयोग होईल. परंतु पिंपरी ते नागलगाव जाणारा शिव पाणंद रस्ताही प्रशासन खुला करून देण्यास तयार नाही,पिंपरी ते नागलगाव जाणारा पाणंद रस्ता खुला करून द्यावा. अशी मागणीही वेळोवेळी प्रशासनाकडे करूनही प्रशासनाने सतत नागरिकांच्या मागणीकडे आजपर्यंत डोळेझाक केली आहे.२७ जानेवारी रोज सोमवारी पुन्हा मारोती तांड्यातील नागरिकांनी रस्ता करून द्यावा अन्यथा ७ फेब्रुवारी २०२५ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, यावेळी मारोती तांड्यातील नागरिक उपस्थित होते.