पोलीस खात्यातून जमविली अमाप माया !! जेलमध्ये जाणार का काया आणि भार्या ?

0
पोलीस खात्यातून जमविली अमाप माया !! जेलमध्ये जाणार का काया आणि भार्या ?

पोलीस खात्यातून जमविली अमाप माया !! जेलमध्ये जाणार का काया आणि भार्या ?

पोलीस खात्यात नोकरी करत असताना, राष्ट्रभक्ती आणि “सदरक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य सदैव आपल्या डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांची संख्या हळूहळू रोडावत जात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पूर्वीच्या काळात आपण या समाजाचे आणि या देशाचे काही देणे लागतो. या भावनेने पोलीस प्रशासन कार्यरत होते. त्यामुळे चांगल्या व्यक्तींचे रक्षण करणे आणि जे दुष्ट आहेत, दुर्जन आहेत. त्यांचा नायनाट करणे अशा पद्धतीचे ब्रीदवाक्य पोलीस प्रशासनाने स्वीकारले.
मात्र हळूहळू भौतिक सुख सुविधाचा मोह वाढत चालल्यामुळे की काय, कोण जाणे? आर्थिक बाबीकडे सर्वच नोकरदार वर्गाचे आकर्षण वाढले. आपल्याला मिळणाऱ्या पगारांसोबतच वरकमाई म्हणून खुशाली आणि बक्षीस, लाच मिळावी अशी अपेक्षा नोकरदार वर्ग बाळगू लागला. पुढे पुढे तर लाच मागणे आपला हक्कच आहे. अशी धारणा होऊ लागली. त्याचाच परिणाम म्हणून भ्रष्टाचारही वाढू लागला.
या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आणून त्याची कठोर अंमलबजावणी केली जावी. अशा पद्धतीची भूमिका शासनाने घेतली, आणि बऱ्याच प्रमाणात अशा पद्धतीच्या भ्रष्ट प्रवृत्तीला आळा घालण्यात या विशेष विभागाला यशही येऊ लागले आहे. मात्र सद्यस्थितीत सांगायचे झाल्यास आभाळच फाटले तिथे ठिगळे कुठे कुठे लावणार? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
नुकतेच एका उपविभागीय पोलीस अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या मालमत्तेच्या अनुषंगाने कोणीतरी या अधिकाऱ्याने जमलेल्या संपत्तीच्या संदर्भात चौकशी करण्याची मागणी केली. त्या मागणीचा विचार करून आणि त्या अनुषंगाने प्रत्यक्ष उघड अगदी पारदर्शकपणे चौकशी करण्याच्या उद्देशाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्या कार्यालयाकडून लोकसेवक सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ. मनीषा संजय पुजलवार या दोघांच्या एकूण संपत्तीच्या संदर्भात चौकशी सुरू झाली. दिनांक 1 मे 1998 ते 31 मार्च 2019 या कालावधीमध्ये पूजलवार दाम्पत्यांनी त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा खुलासा करण्याच्या संदर्भात लाच लचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई कार्यालयाकडून विचारणा होऊ लागली. आपल्याकडे असलेली ही संपत्ती कायदेशीर स्त्रोताद्वारे संपादित केली किंवा कसे? याबाबत त्यांना वेळोवेळी विचारणा करून खुलासा करण्याची संधी दिली. मात्र पुजलवार परिवाराकडून त्यांनी संपादित केलेल्या मालमत्तेबाबत ते पुष्टीदायक पुरावे सादर करू शकले नाहीत.
त्यांनी लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्यांनी प्राप्त असलेल्या कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किमतीची मालमत्ता स्वतःच्या नावे तसेच त्यांची पत्नी सौ. मनीषा संजय पुजलवार यांच्या नावे संपादित केल्याचे उघड चौकशी अंतिम निष्पन्न झाले आहे. अशा पद्धतीचा निष्कर्ष लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई कार्यालयाच्या वतीने जाहीर करण्यात आले. त्यांच्याकडे आढळून आलेल्या 28 लाख 74 हजार 146 किमतीची मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत 16.65% जास्त असल्याचे चौकशी अंति निष्पन्न झाले आहे. सदर विसंगत बेहिशोबी मालमत्ता संपादित करण्यासाठी लोकसेवक संजय पुजलवार यांना त्यांची पत्नी सौ. मनीषा संजय पुजलवार यांनी मदत करून, गुन्ह्यात प्रोत्साहित करून अप्रेरणा दिली आहे, असा ठपका देखील लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई कार्यालयाकडून तपास अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. आणि त्यामुळे या दोघांच्या विरुद्ध नांदेड येथील भाग्यनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी गु.र.न. 59/ 25 कलम 13(1)(ब), 13 (2), 12 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार तसेच पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास लाच लुजपत प्रतिबंधक विभाग नांदेड विभागाच्या पोलीस निरीक्षक श्रीमती माधुरी यावलीकर या करत आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सर्व जनतेस आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, (एजंट), दलाल यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली असल्यास, किंवा करत असल्यास तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयामध्ये संपर्क करावा. माहिती देणाऱ्यांचे किंवा तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

चौकट…….

अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले !!

उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या संजय पुजलवार यांनी संपादित केलेल्या बेहिशोबी संपत्तीच्या संदर्भाने मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या खात्याने अधिक तपास करून गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कारवाई केल्यामुळे, पोलीस प्रशासनात कार्यरत असताना काही वेळा काम करण्यासाठी तर कित्येक वेळा गैर कायदेशीर मार्गाने चालू असलेल्या उद्योगधंद्यांची पाठराखन करण्यासाठी मोठमोठे हप्ते वसुली करून, भरमसाठ पैसा जमवलेल्या कित्येक मोठ्या अधिकाऱ्यांना देखील लाजवेल, अशी संपत्ती काही पोलीस निरीक्षकांनी जमवल्याची चर्चा लातूर जिल्ह्यात चालू आहे. ही चर्चा विचारात घेतल्यास निश्चितपणे नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल झालेला हा गुन्हा अशा पोलीस अधिकाऱ्यांची झोप उडवणारा ठरू शकेल! यात तिळमात्र शंका नाही.

चौकट…..

पतीने जमवलेल्या मोहमाये मध्ये पत्नीचाही सहभाग?

वास्तविक पाहता कित्येक वेळेस पोलीस अधिकारी अगदी बिनधास्तपणे लाच स्वीकारतात. ती लाच किंवा अवैध धंदेवाल्याकडून दिली जाणारी हप्त्याच्या रूपातील “शिदोरी” हे लोक सांभाळून ठेवतात. मात्र या अवैध मार्गाने आलेल्या संपत्तीचे रक्षण कसे करायचे? हे सर्वांनाच जमेल असे नाही.
त्यामुळे अशा चुकीच्या मार्गाने आलेला भरमसाठ पैसा, शेवटी त्यांची पत आणि प्रतिष्ठा घालवतो. इतकेच नाही तर समाजामध्ये ताठ मानेने जगणे देखील कठीण होऊन जाते. दुर्दैव म्हणजे कित्येक वेळा अशा पद्धतीचा पैसा लपवण्यासाठी पत्नीच्या नावाने संपत्ती घेतली जाते, आणि ती बिचारी हाकणाक अशा प्रकरणांमध्ये सह आरोपी होऊन कष्ट सहन करण्याचे तिच्या नशिबी येते.
महिला ह्या अत्यंत संवेदनशील असतात. त्यांना अपमान सहन होत नाही. या गोष्टीचे तरी गांभीर्य चुकीच्या पद्धतीने माया जमा करताना अधिकाऱ्यांनी बाळगली पाहिजे. अशा पद्धतीच्या गुन्ह्याच्या संदर्भात जनजागृतीच्या उद्देशाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्रसिद्धी माध्यमाला आवर्जून कळवले जाऊ लागले आहे. त्यामागचा उद्देश हाच आहे की, लोकांनी सावध होऊन जे अधिकारी अशा पद्धतीने माया जमवत आहेत किंवा भ्रष्टाचार करत आहेत, त्यांना चव्हाट्यावर आणले जावे. आणि इतरांना या गोष्टीची भीती निर्माण व्हावी. अशा समाज हिताच्या विचाराने लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवली जाते, असे म्हटले तर वावगे होणार नाही. असे असले तरीही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणालाही दोषी ठरवता येत नाही. हेही तितकेच खरे आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *