संगणक परिचालकाला हावरटपणा भोवला !! तक्रारदाराने त्याला एसीबीच्या जाळ्यातच ओढला ?

0
संगणक परिचालकाला हावरटपणा भोवला !! तक्रारदाराने त्याला एसीबीच्या जाळ्यातच ओढला ?

संगणक परिचालकाला हावरटपणा भोवला !! तक्रारदाराने त्याला एसीबीच्या जाळ्यातच ओढला ?

लातूर (एल.पी.उगीले) : नुकतेच नोकरीवर लागलेल्या तरुणावर देखील आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घडामोडीचा एवढा मोठा परिणाम होऊ लागला आहे की, तो देखील बिनधास्तपणे लाच मागण्याची हिंमत करू लागला आहे. अगदी छोट्या-मोठ्या कामासाठी देखील आपले काम झटपट व्हावे, अशी अपेक्षा ठेवून लोकही पैसे देऊ लागले आहेत. त्यामुळे नोकरदारांना तर ते हवेच आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये पैसे दिल्याशिवाय आपले काम होणारच नाही. अशा पद्धतीची धारणा सर्वांची होऊ लागली आहे. शिवाय कित्येक ठिकाणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल म्हणावा असा विश्वास वाटत नाही. मात्र लातूर जिल्ह्यामध्ये जेव्हापासून संतोष बर्गे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक म्हणून रुजू झाले आहेत, तेव्हापासून जनतेचा या विभागावर विश्वास वाढू लागला आहे. आणि लोक मोठ्या विश्वासाने आपले गाऱ्हाणे, तक्रारी बिनधास्तपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात येऊन सांगू लागले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमध्ये गती निर्माण झाली आहे.

निलंगा तालुक्यातील एका तरुणाने प्रत्यक्ष येऊन आपली तक्रार दिली. तक्रारदाराचे म्हणणे असे होते की, त्याचे लग्न 31 मे 2024 रोजी झाले असून, तक्रारदार यांना पत्नीच्या नावात बदल करण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने, त्यांनी ऋषिकेश तानाजी शिंदे (वय 28 वर्ष, पद संगणक परिचालक, नेमणूक ग्रामपंचायत कार्यालय शेळगी, तालुका निलंगा, राहणार मौजे शेळगी, तालुका निलंगा) यास कागदपत्र सादर करून विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र तयार करून द्यावे. म्हणून सर्व कागदपत्रे तयार करून त्यांच्याकडे दिली होती. विशेष म्हणजे ग्रामसेवक यांची सही घेऊन प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांना चक्क दोन हजार रुपयांची लाच मागितली. त्यापैकी पाचशे रुपये तक्रारदार यांनी 22 जानेवारी 2025 रोजी दिले. आणि ऋषिकेश शिंदे यांनी ते स्वीकारले. आणि उर्वरित दीड हजार रुपये दिल्यानंतरच विवाह नोंदणी प्रमाणपत्र देतो, असे सांगितले.
सदर रक्कम लाच असल्याची तक्रारदार यांची खात्री झाल्याने, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूर येथे येऊन त्यांनी रीतसर तक्रार दिली होती. सदरील तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेत दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी शासकीय पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, ईलोसे शिंदे यांनी दीड हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी मौजे शेळगी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील चहाच्या टपरीवर शासकीय पंचांच्या समक्ष लाचेची रक्कम स्वीकारली.

आरोपीस लाच लुचपत प्रतिबंधक पथकातील कर्मचाऱ्यांनी लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. यासंदर्भात पोलीस स्टेशन औराद शहाजानी येथे इलोसे ऋषिकेश तानाजी शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शना खाली पर्यावेक्षण अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांच्या मदतीने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पूर्ण पथकाने सापळा यशस्वी केला. या प्रकरणाचा पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली हे करत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, एजंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी शासनाने ठरवलेल्या कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदार यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे कळवले आहे.

चौकट…..

संतोष बर्गे म्हणजे लाचखोरांचे कर्दनकाळ !

लातूर विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक म्हणून संतोष बर्गे रुजू झाल्यानंतर, त्यांनी अत्यंत कठोरपणे कारवाई करायला सुरुवात केली आहे. केवळ लाच स्वीकारली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून ते गप्प बसत नाहीत, तर तो तपासामध्ये अडथळा आणू शकतो. हे विचारात घेऊन त्याला चक्क घरी पाठवण्याची प्रक्रिया ते करतात. आज पर्यंत त्यांनी अनेक लाचखोर कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सापळा यशस्वी झाल्यानंतर निलंबित करून घरी पाठवले आहे.
या प्रकारामुळे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याची भीती निर्माण झाली आहे. बऱ्यापैकी या विभागाची भीती कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. असे आता उघड उघड लोक बोलू लागले आहेत. यावरूनच पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे म्हणजे लाचखोरांचे कर्दळकाळ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांनी अशाच धाडसाने कामगिरी करत राहावी, अशी जनतेतून मागणी ही होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *