उदगीरला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापण करण्यासाठी माजी मंत्री संजय बनसोडे अग्रेसर, महसूल मंत्र्याकडून हिरवा कंदील !
उदगीरला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापण करण्यासाठी माजी मंत्री संजय बनसोडे अग्रेसर, महसूल मंत्र्याकडून हिरवा कंदील !
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांचे आणि विशेषतः शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न जलद गतीने सुटावेत, छोट्या छोट्या कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे लागू नये, त्या ऐवजी उदगीर येथेच अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करावे या प्रमुख मागणीला धरून माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे आग्रही आहेत.
तीन राज्याच्या सीमेवर असलेले उदगीर शहर हे एक ऐतिहासिक शहर असून येथील बाजारपेठ मोठी असल्याने व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. कधीकाळी या शहराने संपूर्ण देशामध्ये डाळ उद्योग निर्यातीत अग्रक्रम ठेवला होता. एकूण सर्वच बाजारपेठेच्या वाढीच्या दृष्टीने विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहेत.
उदगीर शहरालगत दोन-तीन तालुके असून दिवसेंदिवस महसूल विभागाची कामे वाढत आहेत, यासाठी उदगीर ते लातूर हे जवळपास 70 किलोमीटरचे अंतर पार करून लातूरला जावे लागत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. याकरिता उदगीरला अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय स्थापण करावे. अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे.
उदगीर शहरात सद्या जिल्हास्तरीय न्यायालय, आर. टी. ओ. कार्यालय वेगवेगळ्या प्रकारची अनेक जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर असल्याने येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन मतदारसंघातील जनतेचा वेळ व पैसा वाचेल, व अधिक जलदगतीने कामे होण्यास मदत होईल, म्हणून सदर कार्यालय लवकरात लवकर उदगीरला करावे. अशी लेखी मागणी आमदार संजय बनसोडे यांनी केली आहे. त्यांच्या मागणीचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे उदगीर करांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
