सोयाबीन खरेदीला शासनाची मुदतवाढ, आ. बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश, पणनमंत्र्याकडून आदेश जारी!
सोयाबीन खरेदीला शासनाची मुदतवाढ, आ. बनसोडे यांच्या प्रयत्नाला यश, पणनमंत्र्याकडून आदेश जारी!
उदगीर (एल.पी.उगीले) : जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उदगीर मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे हे सतत प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसापासून शासनाच्या धोरणानुसार सोयाबीनच्या खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने, सोयाबीन खरेदी होत नव्हती. मात्र शासनाने तात्काळ शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावे, म्हणून शेतक-यांनी विनंती केली होती.
वास्तविक पाहता यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र वाढलेले आहे, त्यामुळे उत्पन्नही सरासरीपेक्षा जास्त वाढल्याने सोयाबीन विक्री साठी आणखी वेळ वाढवून द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कित्येक शेतकरी शासनाने ठरवून दिलेल्या नाफेड केंद्रावर रांगा लावून बसले आहेत. चार चार दिवस तेच आपल्या मालासह केंद्राबाहेर मुक्काम ठोकून आहेत. शेतकऱ्यांचे हे दुःख आणि वेदना जाणणारा विकासपुरुष आमदार संजय बनसोडे यांनी यासंदर्भात आवाज उठवणे गरजेचे समजून लगेच शासन दरबारी न्याय मागितला आहे. आपण एक भुमीपुत्र व आपले कर्तव्य समजुन शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन माजी क्रीडामंत्री तथा उदगीर मतदार संघाचे आ. संजय बनसोडे यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. विशेष करून लातूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे पेरणीचे क्षेत्र यावर्षी जास्त असल्याने उत्पन्नही वाढल्याचे त्यांनी पणनमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले.
या मागणीचा पणन मंत्र्यांनी सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांच्या सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शेतकरी बांधवांचे सोयाबीन आता खरेदी होईल, अशी अपेक्षा आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.
सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पणन मंत्री जयकुमार रावल यांचे आ. संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहून आ. संजय बनसोडे हे काम करत असल्याने उदगीर मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आ. संजय बनसोडे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहेत.
