उदयोत्सवाचा दुसरा दिवस खाद्य आणि संगीत मेजवानीने रंगला
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात दिनांक 28, 29 व 30 जानेवारी 2025 रोजी संपन्न होत असलेल्या ‘उदयोत्सव’ वार्षिक स्नेहसंमेलन – 2025 च्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे 25 स्टॉल्स आनंदनगरीमध्ये सजवले होते. याचे उद्घाटन उदगीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके, सदस्य अँड. प्रकाश तोंडारे, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. सुधाकर पाटील, उपप्राचार्य डॉ. शंकर कोडचे, विद्यार्थी कल्याण मंडळ प्रभारी डॉ. सुरेश लांडगे, डॉ. मल्लेश झुंगास्वामी, आनंदनगरी समन्वयक डॉ. एम. पी. मानकरी यांची विशेष उपस्थिती होती. आनंदनगरीतील विविध स्टॉल्सचे परीक्षण डॉ. अर्चना मोरे, ग्रंथपाल डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार, प्रा. नागनाथ खांडेकर, दयानंद स्वामी यांनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पारंपरिक व नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थांनी उपस्थितांची मने जिंकली. दुपारच्या सत्रात उर्दू विभागाच्या वतीने उर्दू मुशायरा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संध्याकाळी रंगलेल्या विविध गुणदर्शन या अंतर्गत संगीत महोत्सवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या 06 गीतगायन, 22 समूह तर 10 वैयक्तिक नृत्याविष्कारांनी वातावरण रंगतदार झाले. विविध गुणदर्शन कार्यक्रमा चे परीक्षक म्हणून प्रा.डॉ.वंदना बांसवाडकर, अमित सोनकांबळे आणि सुनील ममदापुरे यांनी कार्य केले ‘उदयोत्सवा’ च्या दुसऱ्या दिवशी खाद्य आणि संगीताच्या मेजवानीचा जल्लोष अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि पाहुण्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.