विद्यार्थ्यांच्या मनावर अपेक्षांचे ओझे लादू नका – डॉ. अरविंद नवले

0
विद्यार्थ्यांच्या मनावर अपेक्षांचे ओझे लादू नका - डॉ. अरविंद नवले

विद्यार्थ्यांच्या मनावर अपेक्षांचे ओझे लादू नका - डॉ. अरविंद नवले

उदगीर (एल पी उगिले) : शिक्षण प्रणाली मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बदल होतो आहे. त्यात प्राधान्याने विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा विचार करत, ज्या क्षेत्रात त्यांना आवड आहे. त्या क्षेत्रात त्यांना गतिमान करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत. पालकांनी आपल्या पाल्यांच्या मनावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादू नये. असे विचार शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अरविंद नवले यांनी मांडले.
ते राधे कृष्ण मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या उदगीर येथील हाय टेक इंग्लिश स्कूलच्या विसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने “उडान”या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उद्घाटक म्हणून बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी शेख शफी, शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख बी के धामणसुरे, विवेक वर्धिनीचे मुख्याध्यापक डी.बी. दाडगे यांच्यासह नॅशनल मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समिऊद्दीन बंदेली, उपाध्यक्ष माजिद देशमुख, सचिव महबूब मंगरुळे, प्राचार्य फर्जाना मंगरुळे, व्यवस्थापकीय संचालक उझेर मंगरूळे , प्राचार्य निजामुद्दीन जागीरदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉक्टर अरविंद नवले यांनी स्पष्ट केले की, दिवसेंदिवस स्पर्धात्मक युग येऊ लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विकसित होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्याच्या दृष्टीने त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जर त्यांना योग्य मार्गदर्शन झाले तर ते निश्चितपणे यशस्वी होऊ शकतात. गेल्या वीस वर्षात हायटेक इंग्लिश स्कूल या शाळेने नावाप्रमाणे उदगीरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले वेगळेपण जपत, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित होण्याचा मार्ग दाखवला आहे. त्याबद्दल या शाळेचे व्यवस्थापन आणि शिक्षक वृंद यांनी घेतलेल्या परिश्रमाचे निश्चित कौतुक केले पाहिजे. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळते. त्यासोबतच मनोरंजनातून शिकण्याची कलाही त्यांना अवगत होते. असेही डॉ. अरविंद नवले यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. महबूब मंगरुळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून संस्थेच्या विकासाचा आलेख विद्यार्थी आणि पालकांच्या समोर मांडला. आत्तापर्यंत दहावी इयत्तेच्या सात बॅच यशस्वी झाल्या आहेत. सतत 100% निकालाची परंपरा या शाळेने जपली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी देश पातळीवर आपले नावलौकिक करत असतानाच उदगिरचेही नावलौकिक केले आहे. अनेक विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रातील विविध विभागात यश मिळवून एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस तसेच अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये आयआयटी सारख्या नामांकित कॉलेजमध्ये ही प्रवेश मिळवलेला आहे. उदगीरच्या शैक्षणिक परंपरेला साजेल अशा पद्धतीचे कार्य अल्पावधीत मोठ्या गतीने ही शाळा करत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व यशामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वृंदांनी घेतलेली मेहनत असल्याचेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी अनेक मान्यवरांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शबाना मॅडम आणि महाजन सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीदेवी पाटील यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed