दुग्धव्यवसाय प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून स्वतःच्या उन्नती बरोबरच गावाची उन्नती करा – डॉ. नंदकुमार गायकवाड

दुग्धव्यवसाय प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून स्वतःच्या उन्नती बरोबरच गावाची उन्नती करा - डॉ. नंदकुमार गायकवाड
उदगीर (एल.पी.उगीले) : उन्नत भारत अभियानांतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीरच्या दत्तक ग्राम असलेल्या पिंपरी ता. उदगीर येथील पशुपालक शेतकऱ्यांसाठी ” किफायतशीर दुग्धव्यवसाय” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर येथे डॉ. नंदकुमार गायकवाड, सहयोगी अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणामध्ये एकूण २६ प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणा दरम्यान ११ व्याख्याने व ५ प्रात्यक्षिके, १ गोठा भेट, प्रदर्शनी भेट इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान गावातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवून त्यांच्या व्यवसाय प्रगतीसाठी हातभार लावा आणि एकूणच स्वतःच्या उन्नती बरोबरच गावाच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करा. असे मत डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी या तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वितरण व सांगता समारंभ प्रसंगी व्यक्त केले. त्यांनी यापुढेही पशुपालकास विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत उपस्थित पशुपालक शेतकऱ्यांना आश्वासित केले. यावेळी डॉ. प्रशांत मसारे, समन्वयक, उन्नत भारत अभियान, पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर यांनीही प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाबाबत प्रशिक्षणार्थीनी समाधान व महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले तसेच या ज्ञानाचा वापर करून यापुढे दुग्धव्यवसायात वृद्धी करू अशी हमी प्रशिक्षणार्थीनी दिली. प्रास्ताविक डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, प्रशिक्षण समन्वयक तथा नोडल अधिकारी दत्तक ग्राम पिंपरी यांनी केले. उदघाटन व सांगता समारंभाचे सूत्रसंचालन सह-समन्वयक डॉ. मत्स्यगंधा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सह-समन्वयक डॉ. रविराज सूर्यवंशी यांनी केले.