सोयाबीन खरेदीसाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ द्या – भरत चामले

सोयाबीन खरेदीसाठी 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ द्या - भरत चामले
उदगीर (एल.पी.उगीले) : केंद्र सरकार द्वारे नाफेड मार्फत राज्यात शासनाच्या प्रयत्नातून हमीभावाने सोयाबीन खरेदी चालू केली आहेत. त्याबद्दल खरेदी-विक्री संघाच्या वतीने आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी यांच्या वतीने शासनाचे धन्यवाद मानत असतानाच, ही खरेदी जर चालू केली नसती तर बाजारामध्ये सोयाबीनचा भाव फार कमी राहिला असता, आणि शेतकऱ्यांची फार मोठी गोची झाली असती. यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढल्यामुळे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरासरी विचार केल्यास प्रत्येक शेतकऱ्यांना हजारो रुपये कमी मिळाले असते ते शासनाच्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पडले आहेत.
मात्र सध्या नोंदणी केलेल्या पूर्ण शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीची क्षमता विचारात घेतल्यास आणखी मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक आहे. यावर्षी बाजारात हरभरा व तुरीला भाव हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे तुर, हरभरा खरेदी फार करावी लागणार नाही, असे आज जरी वाटत असले तर नगदी पीक म्हणून 80% सोयाबीनची पेरणी झाल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन खरेदीसाठी नाफेड केंद्राला अगोदर 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आणखी सहा दिवस दिलेली आहेत. मात्र ही मुदत देखील अपुरी आहे. कारण कित्येक शेतकरी खरेदी केंद्राच्या बाहेर मुक्काम ठोकून आहेत. गाडी भाड्याला महाग होण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्र शासनाने सोयाबीन खरेदीसाठी हमी केंद्रांना 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी. जर ही मुदतवाड देणे शक्य नसेल तर बाजारभावातील फरका प्रमाणे कमीत कमी आठशे ते हजार रुपये शेतकऱ्यांना फरकाची रक्कम शेतकऱ्यास देण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख क्विंटल चे उद्दिष्ट वाढवून दिल्यामुळे शेतकऱ्यांचा निश्चित फायदा होणार आहे. मात्र वेळेची मर्यादा विचारात घेऊन आणखी वेळ देणे गरजेचे आहे. लातूर जिल्ह्याला सोयाबीन हमीभावाने खरेदीचे बारा लाख 48 हजार 170 क्विंटल चे उद्दिष्ट प्राप्त झाले होते, मात्र हे उद्दिष्ट पूर्ण होऊनही काही नोंदणी कृती शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी शिल्लक असल्याने लातूर जिल्ह्याला आणखी दोन लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ही अत्यंत अभिनंदननीय बाब असल्याचेही भरत चामले यांनी नमूद केले आहे. एका अर्थाने शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लातूर जिल्ह्याला हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी आता 6 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ती मुदत वाढ आणखी वाढवून द्यावी, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन नाफेडच्या केंद्रावर देता येईल.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन शिल्लक असल्याने जिल्ह्याचे उद्दिष्ट वाढवून सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत होती. जिल्हा पणन अधिकारी यांनी शासनाकडे या संदर्भात अहवाल सादर केला होता. त्याप्रमाणे दोन लाख क्विंटल सोयाबीनचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयाबद्दल खरेदी विक्री संघाचा चेअरमन म्हणून आपण शासनाचे अभिनंदन करत असल्याचेही भरत चामले यांनी नमूद केले आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून मुदतवाढ 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी. अशी विनंती ही शासन दरबारी त्यांनी केली आहे.