बिंदूनादकलातीत’ एक वेगळा शब्दवेध, अ. भा. म. नाट्य परिषदेचा अभिवाचन उपक्रम
बिंदूनादकलातीत’ एक वेगळा शब्दवेध, अ. भा. म. नाट्य परिषदेचा अभिवाचन उपक्रम
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उदगीर च्या वतीने ‘शब्दवेध’ची निर्मिती असलेला ‘बिंदूनादकलातीत’ हा प्रयोग उदगीरच्या नाट्यप्रेमी रसिकांसमोर सादर झाला. भारतीय रंगभूमीवरील महाननाटककार महेश एलकुंचवार यांची बिंदूनादकलातीत ही साहित्यक्षेत्रातील चिरंजीवी कलाकृती ! त्यांनी नाट्यमय अभिव्यक्तीचे अनेक प्रकार आपल्या नाटय लेखनात केलेले आहेत. ज्यात वास्तववादी , प्रतीकात्मक, अभिव्यक्तीवादी शैलीत रचना केलेल्या आहेत. सर्जनशीलता ही त्यांच्याकडे उपजत आहे. जीवनवादी नाटककार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जन्म ते मृत्यू यासारख्या विविध थीम त्यांनी मांडल्या आहेत. त्याचाच प्रत्यय ‘बिंदूनादकलातीत’ या त्यांच्या लेखनाच्या अभिवाचनातून येतो. जेष्ठ गायक, अभिनेते व दिग्दर्शक चंद्रकांत काळे व युवा रंगकर्मी हर्षद राजपाठक यांच्या ७५ मिनिटांच्या अभिवाचनातून उदगीरकरांना अंतर्मुख केले.
अ. भा. म. नाट्य परिषदेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी ‘नाट्य साहित्याचे अभिवाचन’ या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी पुणे येथून आलेल्या नाट्यकलावंताचे उदगीर शाखेच्या वतीने हार्दिक स्वागत केले व विविध नाट्यप्रकार उदगीरच्या रसिक श्रोत्यांना देण्यासाठी ही नाट्य चळवळ यापुढेही कार्यरत राहील, अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. कालिदास बिरादार यांनी मानले. याच कार्यक्रमात एकता मराठी फाउंडेशनच्या वतीने ‘पटकथा लेखन : तंत्र व कौशल्य’ या संशोधन पुस्तकास राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. रामदास केदार यांचा व पुणे येथील साहित्यदीप प्रतिष्ठानचा ‘कथादीप’ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा. अश्विनी निवर्गी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. गौरव जेवळीकर, सहकार्यवाह डॉ. संजय कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमित आग्रे, प्रा. डॉ. किरण गुट्टे, बालाजी मुस्कावाड यांनी पुढाकार घेतला.
