महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या महिलांना अटक
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरणाऱ्या महिलांना अटक
लातूर (एल.पी.उगीले) : इत मंगळसूत्र गंठण चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. 40.5 ग्राम सोन्याचे दागिनेसह, 1 लाख 33 हजार 194 रुपयांचा मुद्देमाल जप्त केले असून, या आरोपीकडून4 गुन्हे उघड झाले आहेत.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी, अमलदारांचे पथक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. सदर पथका मार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
दरम्यान 30/01/2025 पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन महिलांना रेनापुर नाका ते गरुड चौक जाणारे रोडवरून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव स्वाती उमाकांत तपसाळे, (वय 32 वर्ष, राहणार जयनगर, लातूर),
महादेवी सर्जेराव देडे, (वय 34 वर्ष, राहणार जयनगर, लातूर). असे असल्याचे सांगितले. नमूद महिलांना महिला पोलिसाच्या मदतीने ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी मागील काही महिन्यापासून लातूर शहरातील व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन, बस मधून चढ-उतार करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण चोरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले.
त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता, पोलीस ठाणे औसा येथील मंगळसूत्र चोरीचे 2 गुन्हे, पोलीस ठाणे गांधीचौक व निलंगा येथील प्रत्येकी 1 गुन्हा असे चार गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहेत.
नमूद आरोपींनी वर गुन्ह्यात चोरलेला सोन्याचे 40.5 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्रे, गंठण असा एकूण 01,33,194 /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वात पोलीस उप-निरीक्षक संजय भोसले,पोलीस अमलदार योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले, महिला पोलीस अमलदार हिंगे, चालक पोलीस अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.
