अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठीत तंत्रज्ञान उपलब्ध होईल – प्राचार्य डॉ. मस्के

0
अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठीत तंत्रज्ञान उपलब्ध होईल - प्राचार्य डॉ. मस्के

अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठीत तंत्रज्ञान उपलब्ध होईल - प्राचार्य डॉ. मस्के

शिरूर अनंतपाळ (एल.पी.उगीले) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत होती. मराठी माणूस आणि साहित्यिकांकडून या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला जात होता. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे, मराठी भाषेला न्याय मिळाला असून विकासामध्ये भर पडणार आहे. सामान्य माणसाला त्यामुळे तंत्रज्ञानाचे ज्ञान मराठीतून उपलब्ध होऊ शकेल , असा विश्वास सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी शिरूर अनंतपाळ येथे परिसंवादात बोलताना व्यक्त केला.
शिरूर अनंतपाळ येथील देवीसिंह चौहान साहित्य नगरी येथे संपन्न झालेल्या दोन दिवसीय चौथ्या मराठी साहित्य संमेलनात “अभिजात मराठी भाषा संधी व आव्हाने” या विषयावर झालेल्या परिसंवादात डॉ. मस्के बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे होते.
शिरूर अनंतपाळ येथील साहित्य संस्कृती संवर्धन मंडळ मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने हे संमेलन संपन्न झाले.
कर्नाटकातील श्रवण बेळगोळ येथील भगवान बाहुबलीच्या मूर्तीच्या पायथ्याशी खोदलेला’ श्री चामुंडराये करवियले’ हा मराठीतील पहिला ज्ञात असा शिलालेख होय, असे सांगून डॉ. मस्के म्हणाले, मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी, असा आग्रह मराठी साहित्य आणि मराठी माणसांचा होता. मात्र शासनाचा त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. आता उशिराने का होईना अभिजात दर्जा मिळाला आहे . त्यामुळे सामान्य माणसाला तंत्रज्ञानाचे ज्ञान त्यांच्या बोलीभाषेत मिळू शकेल. अभिजात भाषेचा दर्जा ही मराठी भाषिकांना मिळालेली संधी असून या संधीचे रूपांतर आपण आव्हानांमध्ये केले पाहिजे. मराठी भाषेसमोर आज अनेक आव्हाने आहेत .या आव्हानांवर मात करून एक प्रमाण भाषा तयार झाली पाहिजे .जागतिक दर्जाचे साहित्य मराठीत भाषांतरित झाले पाहिजे. मराठीत आजकाल इंग्रजी शब्द भरपूर येत आहेत. ते टाळून मराठी प्रतिशब्द त्याला योजले पाहिजेत. मराठीतील अनेक जुने शब्द लोप पावले आहेत .त्या शब्दांचे पुनरुज्जीवन व्हायला हवे.

अध्यक्षीय समारोपात, प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरही मराठी भाषेत बद्दलची उदासीनता वेळोवेळी स्पष्ट झालेली आहे. या उदासीनतेमुळेच आणि राजकीय इच्छाशक्ती अभावी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकला नव्हता ,असे सांगून ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे म्हणाले, प्रचलित नावाने मराठीच्या 52 बोलीभाषा आहेत. तथापि विस्ताराने बघितले तर ही संख्या 94 पर्यंत जाते. या सर्व बोलीभाषांना एकत्रित करून अभिजात भाषा तयार करण्याचे आव्हान आता आपल्यापुढे आहे. आतापर्यंत तामिळ संस्कृत, मल्याळम, तेलुगु, कन्नड आणि ओडिया या सहा भाषांना हा दर्जा मिळाला होता .त्यात आता मराठी भाषेचा समावेश झाला आहे. अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला केंद्र सरकार द्वारे दिला जाणारा एक विशिष्ट दर्जा आहे. अभिजात भाषेचा दर्जा असलेल्या आता एकूण 11 भाषा देशात झाल्या आहेत. किमान दीड ते दोन हजार वर्षांचा प्राचीन इतिहास भाषेला हवा. त्या भाषेतील समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी .ते मूळ त्याच भाषेत लिहिलेले असावेत, अनुवादित नसावेत आणि भाषेचा प्रवास अखंडित असावा, प्राचीन आणि सध्याच्या भाषेतील नाते सुस्पष्ट हवे, असे अभिजात भाषेचे निकष आहेत.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्र सरकारकडून दरवर्षी अडीचशे ते तीनशे कोटी रुपयांचे अनुदान महाराष्ट्राला मिळेल. या अनुदानाचा विनियोग भाषेचा प्रचार करण्यासाठी भाषा भवन उभारणे , ग्रंथ आणि साहित्याचा प्रचार करण्यासाठी मदत करणे, ग्रंथालय उभारणे यासह अन्य उपक्रमांच्या माध्यमातून भाषेचा प्रचार करण्यासाठी आर्थिक मदत करणे, यासाठी करता येईल, जागतिक दर्जाच्या साहित्यकृती मराठीत येण्यासाठी भाषांतर मंडळ स्थापन करण्याचा एक प्रस्ताव शासन दरबारी आहे. तो आता लवकर मार्गी लागू शकेल. प्राचीन मराठी साहित्यातील विशेषतः संत साहित्यातील हस्तलिखिते जतन करून ठेवता येतील,असेही ते म्हणाले.
प्रारंभी संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. अरविंद भातांब्रे , बालाजी येरोळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष कवी देवीदास फुलारी, प्रभाकरराव कुलकर्णी, बालरोगतज्ञ डॉ. मन्मथ भातांब्रे, एल .बी .आवाळे, ऋषिकेश बद्दे, प्राचार्य शिवाजीराव मादलापुरे, धनंजय गुडसुरकर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य मार्तंडराव कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!