मुक्त विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमुळेच मी घडले – प्रतीक्षा राठोड
मुक्त विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमुळेच मी घडले - प्रतीक्षा राठोड
अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रीय सेवा योजना ही जीवन घडविणारी कार्यशाळा असून, राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामुळेच मी घडले. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे मी घडले.माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला, असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी कु. प्रतीक्षा राठोड यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तालुक्यातील मौज हासरणी येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष युवक शिबिराच्या समारोपप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कु. प्रतीक्षा राठोड या बोलत होत्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मौजे हासरणी येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारणी सदस्य ज्ञानदेव झोडगे गुरुजी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पी. टी. शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, बिदर जिल्हा महाराष्ट्र एकीकरण समितीचे सचिव पृथ्वीराज पाटील एकंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पाटील तोंडचिरकर, अहमदपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, सरपंच वैशालीताई करे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव गोंड गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण अभ्यास केंद्राची विद्यार्थिनी प्रतीक्षा राठोड यांची रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी येथे पोस्ट ऑफिस शाखा व्यवस्थापकपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना त्या पुढे म्हणाल्या की, महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामुळेच माझ्या जीवनात अमुलाग्र परिवर्तन झाले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोस्ट खात्यात निवड झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राचा उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून ओम मुंडे याचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील यांनी मानले.
