अशोकराव पाटील एकंबेकर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहणारे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अशोकराव पाटील एकंबेकर यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान कायम स्मरणात राहणारे - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठवाड्यात ज्या नामांकित शिक्षण संस्था कार्यरत आहेत, त्यापैकी उदगीरची किसान शिक्षण प्रसारक मंडळ ही एक अग्रगण्य, प्रगत शिक्षण संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून कै. अशोकराव पाटील एकंबेकर यांनी शिक्षण क्षेत्राला दिलेले योगदान कायम स्मरणात राहणारे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कै. अशोकराव पाटील एकंबेकर जयंती कार्यक्रमात अध्यक्षपदावरून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, कै. अशोकराव पाटील यांच्याकडे मूलभूत अशी शैक्षणिक दृष्टी होती. स्वर्गीय माजी आमदार बापूसाहेब पाटील एकंबेकर यांचा वारसा त्यांनी खंबीरपणे चालवला. त्यांच्या कारकीर्दीत किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शाळा महाविद्यालयांतील प्रगती ही नेत्रदीपक होती, आणि यापुढेही त्यांच्या त्यागाचा आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वारसा नेटाने चालवला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. सूत्रसंचालन ह. भ. प. डॉ. अनिल महाराज मुंडे यांनी केले.तर डॉ. सतीश ससाणे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
