नॉर्मल डिलिव्हरी करणारे डॉ. शरद तेलगाने यांचा सत्कार संपन्न
नॉर्मल डिलिव्हरी करणारे डॉ. शरद तेलगाने यांचा सत्कार संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : सध्या ग्रामीण भागात आणि शहरात देखील गर्भवती महिलांना शारीरिक श्रमाची कोणतीही कामे नसल्याने, गर्भधारणा झाल्यानंतर शरीराची हालचाल ही कमी झाल्याने तसेच पूर्वी ज्या पद्धतीने दळण दळणे, विहिरीचे पाणी शेंदने, सारवण करणे, शेताकडे जाणे येणे, धान्य पाखडणे, निवडणे, कांडणे, अशी कामे आता राहिली नाहीत. अगदी घरातील धुनी भांडी करण्यासाठी देखील लवकर ठेवल्यामुळे गर्भवती महिलांना बाळंतपणामध्ये वेदना सहन करण्याची क्षमता राहिलेली नाही. तसेच उच्च शिक्षित आणि स्वतःला अत्याधुनिक पद्धतीची समजणाऱ्या महिलांची मानसिकता सहज प्रसुतीसाठी शस्त्रक्रिया व्हावी या मानसिकते कडे वळली आहे. प्रसूती वेदना देखील सहन करायची त्यांची मानसिकता राहिलेली नाही. तसेच हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मळे शहरातील नोकरी करणारे दाम्पत्य देखील सहज आणि सुलभ प्रसूती व्हावी. यासाठी शस्त्रक्रियेला प्राधान्य देत आहेत. सध्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कुटुंब नियोजनाला प्रमाण वाढलेले असल्यामुळे घरामध्ये एखाद दुसरी मुलगी असल्याने, त्या मुलीला वेदना होऊ नयेत. अशी भूमिका मुलीच्या आई-वडिलांची तसेच इतरही नातेवाईकांची असते. त्यामुळे मुलगी जेव्हा बाळंतपणासाठी माहेरी येते तेव्हा सुलभ प्रसूती होत नसेल तर सरळ सरळ शस्त्रक्रिया करा आणि सहज प्रसूती होऊ द्या. अशी मागणी नातेवाईकाकडून होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत देखील ग्रामीण भागातील नातेवाईकांना रुग्णांना समजावून सांगून, नैसर्गिक बाळंतपण झाले पाहिजे, ज्यामुळे बाळ आणि बाळंतीण सुदृढ राहतील. असा सल्ला देऊन दवाखान्याचा खर्च कमी करून रुग्णावर उपचार करणारे आणि त्यांच्या हिताचा निर्णय सांगणारे उदगीर शहरातील गरिबांचा मसीहा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. शरद कुमार तेलगाने यांचा सत्कार नॉर्मल डिलिव्हरी झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी आणि मित्र परिवाराकडून करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे काळाचा बदललेला महिमाच म्हणावा लागेल, पूर्वी अपवादाने शस्त्रक्रिया केली जायची मात्र आता सर्रास शस्त्रक्रियाच केली जात असल्याने नॉर्मल डिलिव्हरी करणाऱ्या डॉ. बद्दल कौतुक आणि अभिनंदन करावे. असे नातेवाईकांना वाटू लागले आहे. अगदी भरवलेल्या परिस्थितीमध्ये डॉक्टर शरद कुमार तेलगणे यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. याप्रसंगी नगरपालिकेचे कर्मचारी पारखे तसेच नवजात बाळाची आजी शहनाज पाशा शेख, इशरत इलियास शेख, आत्या फरीदा महबूब शेख, बोधन नगर उदगीर यांनी ओम हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम येथे जाऊन डॉ. शरद कुमार तेलगाने आणि त्यांच्या सहकारी डॉक्टरांचा सत्कार केला आहे. याप्रसंगी डॉक्टर सौ. अनुराधा कापडे, डॉक्टर विशाखा शिंदे, मॅटरनिटी होमचे कर्मचारी इंदिरा सूर्यवंशी, लक्ष्मी सूर्यवंशी, उषा, अनुजा मावशी व नवजात बाळाची आई उपस्थित होते.
उदगीर शहरात सतत नॉर्मल डिलिव्हरी चा प्रयत्न करणारे आणि गरिबांना परवडेल अशी सेवा देणारे संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा समाजप्रबोधक डॉ. शरद कुमार तेलगाने यांचे कौतुकही याप्रसंगी नातेवाईकांनी केले आहे. तसेच त्यांच्या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक प्रस्तुतीलाच प्राधान्य दिले जाते, अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये शस्त्रक्रिया केली जाते. वैद्यकीय क्षेत्राला बदनाम करणारी शस्त्रक्रिया पद्धती सध्या सर्वत्र रूढ झाली आहे. असे असताना देखील डॉक्टर शरद कुमार तेलगाने नैसर्गिक प्रसुतीला प्राधान्य देतात हे कौतुकास्पदच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
