राज्यशास्त्र संशोधन केंद्रामार्फत आपले संविधान अमृत महोत्सव-२०२५
राज्यशास्त्र संशोधन केंद्रामार्फत आपले संविधान अमृत महोत्सव-२०२५
मुरूम (एल.पी.उगीले) : भारतीय संविधानाला नोव्हेंबर २०२५ मध्ये अमृत महोत्सवी ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने २०२४-२५ हे संपूर्ण वर्ष भारतीय संविधानाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने श्री माधवराव पाटील महाविद्यालयात अमृत महोत्सव -२०२५ संविधान जागर अभियानांतर्गत राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्र आयोजित संविधान आपले या भित्तिपत्रकाचे उद्घाटन फीत कापून प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विषयाचे प्रा. दिपक सांगळे, भूगोल विषयाचे प्रा. अमोल गायकवाड, मोहन जाधव, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी संजय सावंत, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डॉ. सायबण्णा घोडके, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. राजकुमार रोहीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी राज्यशास्त्र विभागामार्फत उद्देश पत्रिकेचे मॉडेल व संविधाना बद्दलचा विस्तारित अहवाल प्राचार्यांकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी सामूहिक संविधानाचे वाचन करण्यात आले. यावेळी मोहन जाधव संविधानाबद्दल म्हणाले की,
भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक म्हणून नवा अध्याय सुरू केला. संविधान सभेने तयार केलेले संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आले, मात्र २६ जानेवारी १९५० रोजी ते अधिकृतपणे लागू करण्यात आले. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २ वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांच्या मेहनतीनंतर हे संविधान तयार झाले. यामध्ये लोकशाही, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता यासारख्या मूलभूत तत्वांना प्राधान्य देण्यात आले आहे. संविधान स्वीकारल्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्या दिवसापासून नवा प्रशासनिक कारभार हाती घेतला. संविधान लागू झाल्यामुळे भारत अधिकृतपणे प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा पाया अधिक मजबूत झाला असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी डॉ. घोडके यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य सपाटे यांनी संविधानाचे सर्वांनी आचरण करणे गरजेचे असल्याचे म्हटले. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. राम बजगिरे, डॉ. रमेश आडे, डॉ. अरुण बावा, डॉ. सुजित मटकरी, डॉ. किरण राजपूत, डॉ. अविनाश मुळे, डॉ. संध्या डांगे, प्रा. अजिंक्य राठोड, प्रा. लखन पवार, अमोल कटके आदींनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले तर आभार प्रा. डॉ. रवींद्र आळंगे यांनी मानले. यावेळी फार्मसी कॉलेज व महाविद्यालयातील प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विविध शाखेतील बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
