अमली पदार्थांच्या व्यसनांपासून तरुण पिढीला दूर ठेवणे काळाची गरज – डॉ. व्ही. एस. सुर्यवंशी
अमली पदार्थांच्या व्यसनांपासून तरुण पिढीला दूर ठेवणे काळाची गरज - डॉ. व्ही. एस. सुर्यवंशी
मुरुम (एल.पी.उगीले) : उमरगा येथील श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालयात समाजशास्त्र विभागांच्या वतीने “अमली पदार्थांचे सेवन आणि व्यसनाधीनता” या विषयांवर एक जाणीव जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय अस्वले तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.व्ही.एस. सुर्यवंशी उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी अमली पदार्थांचे व्यसनांची सुरुवात ही कुतूहल आणि आनंदानुभवातून होत असली तरी शेवट मात्र दु:खाने होतो. कारण त्यातून शारीरिक, मानसिक व आर्थिक हानी प्रचंड प्रमाणात होत असते.त्यामुळे अमली पदार्थांच्या व्यसनांच्या चक्रव्यूहातून तरुणांना बाहेर काढने गरजेचे आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पी.पी.टी च्या माध्यमातून अमली पदार्थांचे स्वरूप, त्यांची कारणे,व त्यावरील उपाय योजना स्पष्ट करत अनेक अहवाल, सर्व्हे, कायदे, फोटो, चित्रे,आकडेवारी यांच्या माध्यमातून या विषयांचे गांभीर्य विद्यार्थ्यांना पटवून दिले. तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करावे, व महाविद्यालयात चालणाऱ्या विविध उपक्रमात सहभागी होऊन आपल्या व्यक्तीमत्वाचा विकास साधावा, असे प्रतिपादन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ.विलास इंगळे,उपप्राचार्य डॉ.पद्माकर पिटले , कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रदीप पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मुक्ता पोफळे यांनी तर आभार सैफ इनामदार यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ.डी.व्ही.पडोळे, डॉ. सुमेध राजूरकर,एन.सी.सी.कॅडेट, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
