भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणात पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे कार्य उल्लेखनीय – श्री. सुंदर बोंदर
भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरणात पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे कार्य उल्लेखनीय - श्री. सुंदर बोंदर
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरामधील भटक्या श्वानांचे पशुवैद्यकीय महाविद्यालय करत असलेले निर्बिजीकरणाचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांनी केले. ते पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर व वर्ल्ड वाईड व्हेटेरीनरी सर्व्हिसेस युके यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्कृष्ठ पशु निर्बिजीकरण कार्यपद्धती’ या विषयावर आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी उदगीरमधील भटक्या श्वानांना पकडून पशुवैद्यकीय महाविद्यालयात शस्रक्रियेसाठी आणण्याचे कार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.नंदकुमार गायकवाड उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर जळकोट नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश पाटील, प्रशिक्षण समन्वयक डॉ.अनिल पाटील आणि डॉ.सुमंथ बेद्रे उपस्थित होते. प्रा.डॉ. गायकवाड यांनी या प्रसंगी भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज विरोधी लसीकरणाचे महत्व विषद केले. तसेच अभियान यशस्वी होण्यासाठी वर्ल्ड वाईड व्हेटेरीनरी सर्व्हिसेस व नगरपरिषद, उदगीरचे कर्मचारी करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली.
प्रशिक्षण समन्वयक डॉ.अनिल पाटील यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट करताना वर्ल्ड वाईड व्हेटेरीनरी सर्व्हिसेस, लंडनच्या मदतीने दि. ०३ ते १४ फेब्रुवारी, दि. १७ ते २८ फेब्रुवारी आणि ०३ ते १४ मार्च दरम्यान तीन चौदा दिवशीय प्रशिक्षणे आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी वर्ल्ड वाईड व्हेटेरीनरी सर्व्हिसेसचे डॉ.वैभव वाघ आणि डॉ.शिवप्रसाद तसेच महाविद्यालयातील प्रा. डॉ.स्नेहल रामटेके, डॉ.रवी सूर्यवंशी, डॉ.शरद आव्हाड, डॉ.प्राजक्ता जाधव, प्रशिक्षणार्थी, पदव्युत्तर विद्यार्थी व अंतिम वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.सागर व आभार प्रदर्शन डॉ.सुदर्शन पटूळे यांनी केले.
