उपेक्षित तृतीयपंथीयांना समजून घेऊन जगण्याचे बळ देण्याची गरज – देवयानी देशमुख
उपेक्षित तृतीयपंथीयांना समजून घेऊन जगण्याचे बळ देण्याची गरज - देवयानी देशमुख
उदगीर (प्रतिनिधी) : माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याला एकटे राहणे पसंत नसते. माणसाचे पुरुष व स्त्री असे मुख्यतः दोन घटक आहेत. यामध्ये तिसरा घटक अस्तित्वात असून जन्मदात्यापासून ते इतर समाजाकडून सातत्याने उपेक्षितच आहे, तो म्हणजे तृतीयपंथी, जो जन्मापासूनच आपल्या वेगळेपणाची अनुभूती घेत असतो. वयात आल्यावर तो कुटुंबातून बाहेर फेकला जातो, तर इतर समाजही त्यांना स्वीकारत नाही. शिक्षणा आणि व्यवसाय या दोन्हीतूनही त्यांना दूर सारण्याचा प्रयत्न होतो. यामुळे त्यांना खूप मोठा मानसिक त्रास होतो. शेवटी नाईलाजाने ते दीक्षा मागतात. अशा उपेक्षित तृतीयपंथीयांना समजून घेऊन जगण्याचे बळ देण्याची गरज आहे. असे मत प्रसिद्ध व्याख्यात्या देवयानी देशमुख ऊर्फ माई, पुणे यांनी व्यक्त केले.
त्या उदगीर येथील चला कवितेच्या बनात च्या 330 व्या वाचक संवाद मध्ये बिंदूमाधव खिरे लिखित समलिंगी,उभयलिंगी, पारलिंगी, तृतीयपंथी, द्विलिंगी, ट्रान्स वुमन, ट्रान्समॅन व व्किअर समाज या साहित्यकृतीवर अत्यंत प्रभावी संवाद साधताना बोलत होत्या . भरत गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली पुढे बोलताना त्यांनी या सर्वांबद्दल वैद्यकीय माहिती, लिंग बदल आणि वैद्यकीय प्रक्रिया, कायदे, त्यांच्या समस्या, नावात बदल, ओळखपत्र, लिंगभाव, लैंगिक समस्या, त्यांच्या संस्था आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, लिंग बदलानंतर बालक आहे दत्तक घेण्याची प्रक्रिया या सर्वांबद्दल सविस्तर माहिती सांगितली. तेव्हा समाजाने चुकीच्या धारणा व गैरसमज दूर सारून त्यांना समजून घेत त्यांच्या भावभावनांचा आदर करत त्यांना जगण्याचे बळ देणे अत्यंत गरजेचे आहे. समाज दीक्षा देतो पण काम देत नाही. उपयोग घेतो पण त्यांच्याकडून काम करून घेत नाही.
यावेळी अत्यंत मोकळेपणाने संवादक आणि वाचक श्रोते यांच्यात सखोल अशी चर्चा झाली, तृतीयपंथीयांचे जीवन, वागणे , नाईलाज, व्यवसाय या सर्वांबरोबरच समाजात असलेली त्यांच्याबद्दलची धारणा त्यांच्याबद्दलचे विचार आणि समाजाकडून त्यांना दिली जात असलेली वागणूक याबरोबरच लैंगिक आकर्षण, संभोग, संतती, संपत्ती,त्यांचे एकूण जीवन या अनुषंगाने अनेक प्रश्न विचारले गेले आणि या सर्व प्रश्नांचे सहज हसत तेवढ्याच गांभीर्याने उत्तरे देऊन हा कार्यक्रम एका उंचीवर नेण्याचे काम संवादक देवयानी देशमुख यांनी केला.
शासकीय दुध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्र संचलन संयोजक अनंत कदम यांनी केले, पाहुण्यांचा परिचय हनुमंत म्हेत्रे यांनी करून दिला. तर आभार अर्जुनराव सोमवंशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मुरलीधर जाधव, भागवत जाधव, प्रा. राजपाल पाटील, मोहन निडवंचे, तुकाराम बिरादार, डॉ. शिवाजी सगर , कचरूलाल मुंदडा, डॉ.नामदेव खंडगावे, यशवंतराव बिरादार, तुळशीदास बिरादार, सुरेश वजनम, आदिंसह अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले.
