प्राचीन ज्ञान परंपरेमुळे भारत जगात सर्वश्रेष्ठ – डॉ. विवेक मणी त्रिपाठी
प्राचीन ज्ञान परंपरेमुळे भारत जगात सर्वश्रेष्ठ - डॉ. विवेक मणी त्रिपाठी
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतामध्ये संशोधनाची प्राचीन परंपरा असून कला, साहित्य, विज्ञान,योग व प्राणायाम, आयुर्वेद, दर्शन, चिकित्सा, खगोलिय आदी दृष्टीने मोठ्या प्रमाणात संशोधन झाले. त्यातून भारतीय संस्कृतीतील वेदना आणि संवेदना जगला कळाली. यामुळेच प्राचीन संशोधन व ज्ञान परंपरेमुळे भारत जगात सर्वश्रेष्ठ ठरत आहे, असे स्पष्ट प्रतिपादन चीन येथील गाँगडाँग विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाचे प्रा. डॉ. विवेक मणी त्रिपाठी यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीचे तसेच महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारतीय संवेदनशीलता: प्रभाव आणि प्रासंगिकता’ या विषयावर आय क्यू ए सी अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आंतर विद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बीज भाषक म्हणून ते बोलत होते.
या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तथा कार्यकारीणी सदस्य ज्ञानदेव झोडगे हे होते तर किसान पीठावर उदघाटक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे माजी कुलगुरू डॉ. मधुकरराव गायकवाड यांची उपस्थिती होती. तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील यांची विशेष उपस्थिती होती. तर प्रमुख उपस्थितीमध्ये चर्चासत्राचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. जाधव, पर्यवेक्षक प्रा. पांडुरंग चाकूरकर तसेच आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक डॉ. प्रकाश चौकटे, सहसमन्वयक डॉ. मारोती कसाब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शोध ग्रंथाच्या दोन खंडाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी पुढे बोलतांना डॉ. विवेक मणी त्रिपाठी म्हणाले की, भारतीय संस्कृती जगासाठी फार महत्त्वाची आहे. भारताने जगाला शांती, समता, ज्ञान आणि बंधुता आदींची शिकवण दिली. त्यातूनच मानवीय संवेदने बरोबरच मानवेत्तर संवेदना निर्माण झाली, असे ही ते म्हणाले. या चर्चासत्राच्या उदघाटकीय मार्गदर्शनाप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुकरराव गायकवाड म्हणाले की, सुख – दुख आदींचा हृदयावर पडलेला प्रभाव म्हणजे संवेदना होय. भारतीयांमध्ये वेगवेगळ्या विषयाला अनुसरून वेदना निर्माण होतात त्या वेदनेतूनच संवेदना निर्माण होते. कारण भारतीय संस्कृती मानवी नीतीमूल्यांची जोपासना करणारी आहे, असेही ते म्हणाले.
तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी आपल्या स्वागत भाषणातून किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर ची तसेच महात्मा फुले महाविद्यालयाची उच्च शिक्षणातील भूमिका, योगदान व महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रातील गुणवत्तेचा आलेख सादर केला. या बरोबरच चर्चासत्रासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, संशोधकांचे व प्राध्यापकांचे स्वागत केले. यावेळी चर्चासत्रासाठी उपस्थित असलेले उद्घाटक माजी कुलगुरू डॉ. मधुकरराव गायकवाड यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी करून दिला तर बीजभाषक डॉ. विवेक मणी त्रिपाठी यांचा परिचय हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. नागराज मुळे यांनी करून दिला.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश चौकटे यांनी केले व सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. किरण गुट्टे यांनी तर आभार चर्चासत्राचे सहसंयोजक डॉ. मारोती कसाब यांनी मानले. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यातून प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
