संस्काराचा पहिला वर्ग आई – डॉ.रामकृष्ण बदने
संस्काराचा पहिला वर्ग आई - डॉ.रामकृष्ण बदने
उदगीर (एल.पी.उगीले) : आई वात्सल्याचा सागर आहे. आई वडिलांच्या सेवेत खऱ्या अर्थाने स्वर्ग आहे.सामान्य माणसाबरोबरचं संत व महापुरुषांच्या जडणघडणीत आईचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे.शाळेतून आपण शिक्षण घेत असलो, तरी लहानपणी शिस्त लावण्याचे काम आई वडील करीत असतात. एका अर्थाने संस्काराचा पहिला वर्ग आईचं आहे, हे विसरून चालणार नाही असे विचार प्रमुख वक्ते डॉ.रामकृष्ण बदने यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व श्री हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने बामणी ता उदगीर येथे बहि:शाल व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच मा.राजकुमार बिरादार तर मंचावर ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर येथील हिंदी विभागातील
प्रा.डॉ.रामकृष्ण बदने, प्रमुख डॉ.दत्ताहरी होनराव उपस्थित होते.
समाजात मूल्य विचार रूजावेत. महामानवांच्या विचाराचा जागर व्हावा, या उद्देशाने सदरील व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रास्ताविकात डॉ.दत्ताहरी होनराव यांनी सांगितले.प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय प्रा.शिवकुमार उस्तुरर्गे यांनी करून दिला.
पुढे बोलताना डॉ.बदने म्हणाले, आईसमोर नतमस्तक झाल्यास कधीच अपयश येणार नाही. उपनिषदापासून तर अलीकडच्या एकविसाव्या शतकातील सगळ्यात साहित्यिकांनी आईविषयी भरभरून लिहिलेले आहे. असे सांगत त्यांनी संत ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा तसेच प्रासंगिकता लक्षात घेऊन अनेक उदाहरणे देत श्रोत्यांना अंतर्मुख केले.
यावेळी डॉ.मनोहर भंडारे,डॉ.विठ्ठल गोरे, डॉ.अमित कवठाळे ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ, गावातील ग्रामपंचायत सदस्य नागरिक व महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वीरभद्र बिरादर तर आभार डॉ.म.ई. तंगावार यांनी मानले.
