समाजाला दिशा देण्याचे कार्य लोकप्रशासनाने करावे – नागराळकर
समाजाला दिशा देण्याचे कार्य लोकप्रशासनाने करावे - नागराळकर
उदगीर (एल.पी.उगीले) : लोकप्रशासन विषयाच्या माध्यमातून समाजकारण, अर्थकारण, राजकारण यासारख्या विविध क्षेत्रांना मार्गदर्शन होत असते. समाजातील सर्व विषयांना स्पर्श करणारे शास्त्र म्हणजे लोकप्रशासन आहे. त्यामुळे राष्ट्राला व समाजाला दिशा देण्याचे कार्य लोकप्रशासनाने करावे, असे मत 1983 साली एम. ए. लोकप्रशासन ही पदवी संपादित केलेल्या बसवराज पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवीन शिक्षण धोरण 2020 नुसार बी.ए. द्वितीय वर्ष नवीन अभ्यासक्रमावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेत उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव रामचंद्र तिरुके हे होते. यावेळी व्यासपीठावर सहसचिव अँड. एस. टी. पाटील, संस्था सदस्य बसवराज पाटील मलकापूरकर, प्रशांत पेन्सलवार, मन्मथ बिरादार, शिवराज वल्लापुरे, दिलीप शेळके, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य सुधाकर पाटील, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संतराम मुंडे, लोकप्रशासन अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एम. आय. शेख, लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. गौरव जेवळीकर उपस्थित होते.*
पुढे बोलताना नागराळकर म्हणाले, लोकप्रशासन विषयाला विशिष्ट अभ्यासक्रमात बंदिस्त न करता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग करावे. ‘लोक’ हा केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख प्रशासनाची निर्मिती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय समारोप करताना सचिव रामचंद्र तिरुके म्हणाले, लोकप्रशासन विषयाच्या माध्यमातून नैतिक विकास कसा होईल ? यावर भर देणे आवश्यक आहे. मूल्याधिष्ठित समाज निर्मितीसाठी लोकप्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संतराम मुंडे म्हणाले, अभ्यासक्रम लागू होण्यापूर्वी घेण्यात येत असलेली लोकप्रशासनाची कार्यशाळा ही विद्यापीठातील इतर विषयांसाठी मार्गदर्शक ठरेल. डॉ. मुंडे यांनी लोकप्रशासन अभ्यास मंडळ व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे यावेळी अभिनंदन केले. लोकप्रशासन अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. एम. आय. शेख म्हणाले, लोकप्रशासन हा विषय केवळ लोकशाही शिकविणारा नाही तर लोकशाहीची जपणूक करणारा आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वसमावेशक व सामूहिक निर्णय प्रक्रियेतून अभ्यासक्रमाची निर्मिती केली जात आहे. या पुढील काळात देखील सर्वांना सोबत घेऊन लोकप्रशासनाची वाटचाल केली जाईल, असे मत व्यक्त केले. या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी बी.ए. द्वितीय वर्षाकरिता विद्यापीठामार्फत लागू करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील लोकप्रशासनाच्या सर्व प्राध्यापक-संशोधक विद्यार्थी यांच्याशी लोकशाहीपद्धतीने अभ्यासक्रमावर चार सत्राच्या माध्यमातून सखोल विचारविनिमय करण्यात आला. या कार्यशाळेसाठी लोकप्रशासनाच्या प्राध्यापकांची पूर्ण वेळ उपस्थिती होती. याच कार्यक्रमात लोकप्रशासन अभ्यास मंडळामार्फत संपादित करण्यात आलेल्या ‘लोकप्रशासनातील जेनेरिक इलेक्टिव्ह’ व ‘लोकप्रशासन सिद्धांत आणि व्यवहार’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी करून दिले. सूत्रसंचालन डॉ. अर्चना मोरे यांनी तर आभार प्रा. संजय बिबीनवरे यांनी मानले.
