सोयाबीन हमीभाव फरक देण्यासाठी सहकार मंत्र्यांना साकडे राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती सोमवंशी यांनी केला ना. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार

0
सोयाबीन हमीभाव फरक देण्यासाठी सहकार मंत्र्यांना साकडे राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती सोमवंशी यांनी केला ना. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभाव फरकाची रक्कम सरकारने द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोषभाऊ सोमवंशी यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे केली. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत आपण विषय मांडू, अशी ग्वाही यावेळी सहकार मंत्री पाटील यांनी दिल्याची माहिती सोमवंशी यांनी दिली.
शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख संतोषभाऊ सोमवंशी यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सोमवारी सत्कार केला. शिरूर ताजबंद येथे इंद्रायणी निवासस्थानी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची सोमवारी सकाळी संतोष भाऊ सोमवंशी व सहकाऱ्यांनी भेट घेतली यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोमवंशी यांनी सहकार मंत्र्यांकडे मांडला. राज्यातील बाजारात सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सोमवंशी यांनी सहकार मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या शेतकऱ्यांना होणारे नुकसान सोसणारे नाही असे सांगून अशा सोयाबीन उत्पादकांना बाजार भाव व हमीभाव यातील फरक रक्कम सरकारने द्यावी, अशी मागणी सोमवंशी यांनी यावेळी सहकार मंत्र्यांकडे केली. दरम्यान सहकार मंत्र्यांनी याबाबत बोलताना आगामी मंत्रिमंडळ बैठकीत आपण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडू, अशी ग्वाही यावेळी सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळास दिली.
यावेळी सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार संतोषभाऊ सोमवंशी यांनी केला. याप्रसंगी शिवसेना चाकूर तालुकाप्रमुख नंदकुमार पवार, अँड. एस. जी. सुगरे, अमोल पाटील, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!