सर्वधर्म समभाव हे शिवरायांच्या स्वराज्याचे नीतितत्व डॉ.विश्वंभर गायकवाड
सर्वधर्म समभाव हे शिवरायांच्या स्वराज्याचे नीतितत्व डॉ.विश्वंभर गायकवाड
उदगीर (एल.पी.उगीले) : छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माण करणारे लोक राजे होते. सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्रित घेऊन त्यांनी स्वराज्य स्थापन केले. सर्वधर्म समभाव हे शिवरायांच्या स्वराज्याचे नीतितत्व होते, असे मत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २९५ या जयंती निमित्त आयोजित ‘परकियांच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर शिवाजी महाविद्यालय व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यान प्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विश्वंभर गायकवाड यांनी काढले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील एकंबेकर होते. तर विचार मंचावर प्राचार्य डॉ. आर.एम.मांजरे, आयक्यूएशीचे प्रमुख तथा ग्रंथपाल डॉ. व्ही.एम.पवार, डॉ.डी.बी. कोनाळे, समन्वयक डॉ. एस. डी. सावंत होते. पुढे बोलताना गायकवाड म्हणाले,अठरा पगड जातींना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले. पाच शाह्या व औरंगजेब यांच्या बलाढ्य मुघल सत्तेला पायबंद घालून सामान्य स्वराज्य उभे केले. धर्म, जात, प्रांत, असे भेद नाकारुन त्यांनी सामान्य माणसांसाठी राज्य निर्माण केले म्हणूनच फ्रेंच,डच, पोर्तुगीज या परकीय सत्ते बदल आदर होता. असे प्रतिपादन या प्रसंगी केले. यावेळी डॉ.डी.बी.कोनाळे यांनी आपल्या भाषणातून शिवचरित्रावर प्रकाश टाकला. जनतेने शिवजयंतीच्या निमित्ताने शिवचरित्र वाचले पाहिजे. महाराजांच्या जीवनातील आदर्श घटना समजून आचरण केले तर खऱ्या अर्थाने शिवजयंती केल्याचे सार्थक होईल. समारोप प्रसंगी अध्यक्ष पृथ्वीराज पाटील एकंबेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा संबंध जीवन काल हा संघर्षमय होता. महाराजांचे विचार काळाच्या ओघात नष्ट न होता ते जिवंत का आहेत? याविषयी या निमित्ताने मीमांसा केली पाहिजे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.एस.डी.सावंत यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
