बहुविध सांस्कृतिक सहिष्णूतेमुळे भारताचा जगावर प्रभाव – अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील
बहुविध सांस्कृतिक सहिष्णूतेमुळे भारताचा जगावर प्रभाव - अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील
अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप
अहमदपूर (गोविंद काळे) : आज जगात सर्वत्र परस्पर अविश्वास आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले असून, या काळात भारतीय संवेदनेला जागतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारताची बहुभाषिकता , बहुधार्मिकता आणि बहुविध सांस्कृतिकता हा जगाच्या कौतुकाचा विषय झाला असून, त्यामुळे संपूर्ण जगात आज भारताचा प्रभाव निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त व महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयक्यूएसी विभागाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय आंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी डॉ. पाटील बोलत होते.
‘ जागतिक परिप्रेक्ष्यात भारताची संवेदनशीलता : प्रभाव आणि प्रासंगिकता’ या विषयावर झालेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर यावेळी किसान पीठावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्या परिषदेचे सदस्य डॉ. नारायण कांबळे, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर लक्षट्टे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी, परिषदेचे समन्वयक डॉ.प्रकाश चौकटे, सह समन्वयक डॉ. मारोती कसाब यांची प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ. एम.के. पाटील म्हणाले की, भौतिक सुविधा, भोग लोलुपता व सत्ता लालसेच्या अतिव भावनेमुळे जग आज विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. या काळात जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता फक्त भारतामध्ये आहे, असेही ते म्हणाले.
तसेच याप्रसंगी डॉ. नारायण कांबळे म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले महाविद्यालयाने गुणवत्तेचा आणि संशोधनाचा नवा पॅटर्न निर्माण केला आहे. परिषदेच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले. यावेळी डॉ. बकुळा कांबळे, डॉ. बालाजी डिघोळे, डॉ. शंकर घाडगे या सहभागी प्रतिनिधींनी आपल्या मनोगतातून चर्चासत्राच्या यशस्वीते बद्दल मत व्यक्त केले. तसेच या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले, तर आभार उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले.
या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेला देशभरातून संशोधक, अभ्यासक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
