वेदनेतूनच संवेदनेचा आविष्कार होतो माजी कुलगुरू डॉ. मधुकरराव गायकवाड यांचे प्रतिपादन

0
ऊद्धव ईप्पर अध्यक्ष. डॉ अतुल खडके उपाध्यक्ष. तर महिला प्रमुख संगीता खंडागळे

ऊद्धव ईप्पर अध्यक्ष. डॉ अतुल खडके उपाध्यक्ष. तर महिला प्रमुख संगीता खंडागळे

अहमदपूर (गोविंद काळे) : जागतिक स्तरावर भारताची सांस्कृतिक विविधतेमुळे वेगळी ओळख निर्माण झाली असून, आदर्श कुटुंब व्यवस्थेमध्ये महत्त्वाचा घटक हा संस्कार असल्यामुळे संस्कारामुळेच वेदनेतून संवेदनेचा आविष्कार होतो, असे स्पष्ट प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे माजी कुलगुरू डॉ. मधुकरराव गायकवाड यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीचे तसेच महात्मा फुले महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘जागतिक परिप्रेक्ष्यात भारतीय संवेदनशीलता: प्रभाव आणि प्रासंगिकता’ या विषयावर आय क्यू ए सी अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आंतर विद्याशाखीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तथा कार्यकारीणी सदस्य ज्ञानदेव झोडगे हे होते तर किसान पीठावर किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील यांची विशेष उपस्थिती होती. तर बीज भाषक म्हणून चीन येथील क्वॉगडाँग विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. विवेक मणी त्रिपाठी यांच्या सह चर्चासत्राचे मुख्य संयोजक प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांच्यासह महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस. आर. जाधव, पर्यवेक्षक प्रा. पांडुरंग चाकूरकर तसेच आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक डॉ. प्रकाश चौकटे, सहसमन्वयक डॉ. मारोती कसाब यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शोध ग्रंथाच्या दोन खंडाचे प्रकाशन करण्यात आले.
या चर्चासत्राच्या उदघाटकीय मार्गदर्शनाप्रसंगी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मधुकरराव गायकवाड पुढे बोलतांना म्हणाले की, सुख – दु:ख आदींचा हृदयावर पडलेला प्रभाव म्हणजे संवेदना होय. भारतीयांमध्ये वेगवेगळ्या विषयाला अनुसरून वेदना निर्माण होतात त्या वेदनेतूनच संवेदना निर्माण होते. कारण भारतीय संस्कृती मानवी नीतीमूल्यांची जोपासना करणारी आहे, असेही ते म्हणाले.
तसेच बीज भाषक डॉ. विवेक मणी त्रिपाठी म्हणाले की, भारतीय संस्कृती जगासाठी फार महत्त्वाची आहे. भारताने जगाला शांती, समता, ज्ञान आणि बंधुता आदींची शिकवण दिली. त्यातूनच मानवीय संवेदने बरोबरच मानवेत्तर संवेदना निर्माण झाली, असे ही ते म्हणाले.
तसेच महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी आपल्या स्वागत भाषणातून किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर ची तसेच महात्मा फुले महाविद्यालयाची उच्च शिक्षणातील भूमिका, योगदान व महाविद्यालयाच्या विविध क्षेत्रातील गुणवत्तेचा आलेख सादर केला. या बरोबरच चर्चासत्रासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, संशोधकांचे व प्राध्यापकांचे स्वागत केले. यावेळी चर्चासत्रासाठी उपस्थित असलेले उद्घाटक माजी कुलगुरू डॉ. मधुकरराव गायकवाड यांचा परिचय इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी करून दिला तर बीजभाषक डॉ. विवेक मणी त्रिपाठी यांचा परिचय हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. नागराज मुळे यांनी करून दिला.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश चौकटे यांनी केले व सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. किरण गुट्टे यांनी तर आभार चर्चासत्राचे सहसंयोजक डॉ. मारोती कसाब यांनी मानले. या चर्चासत्रासाठी महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यातून प्राध्यापक तसेच संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!