भारत स्काऊट गाईडची भव्य शोभा यात्रा व समारोप सोहळा संपन्न
भारत स्काऊट गाईडची भव्य शोभा यात्रा व समारोप सोहळा संपन्न
क्राईस्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अहमदपूरकरांची मने वेधली
अहमदपूर (गोविंद काळे) : क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल तळेगाव, अहमदपूर येथे कब-बुलबुल व स्काऊट-गाईड लातूर जिल्हा मेळाव्याची भव्य शोभायात्रा अहमदपूर शहरामध्ये पार पडली. या शोभायात्रेमध्ये जवळपास २००० विद्यार्थी सहभागी झाले होते. शोभायात्रेचे उद्घाटन महात्मा गांधी कॉलेज अहमदपूर येथे संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, पंचायत समिती शालेय शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. शोभायात्रेमध्ये अनेक शाळांनी देशभक्ती, एकता, समानता, समता, विश्वबंधुत्व, नाटिका, लेझीम, बँड पथक, वेगवेगळे शारीरिक कौशल्याचे सादरीकरण केले. शोभा यात्रेची सांगता जिल्हा परिषद शाळा अहमदपूर या ठिकाणी झाली.
समारोप कार्यक्रमाचे आयोजन क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणामध्ये झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रमुख अतिथी संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे, माजी सभापती सुधीर गोरडे, माजी जिल्हाप्रमुख आयुक्त बाबासाहेब देशमुख, मुख्याध्यापक विठ्ठल मद्देवाड, नांदेड जिल्हा संघटक जनार्दन इरले, माजी सरपंच अशोक कासले, चेअरमन शंकर आगलावे, प्रशिक्षण आयुक्त गोविंद केंद्रे, जिल्हा संघटक आयुक्त डॉ. शंकर चामे प्राचार्य जेबाबेरला नादार यांची उपस्थिती होती. शाळेचे नावलौकिक केलेले केतन शरद माने (शालेय क्रिकेट टीम) व दत्ता संतोष फड (नॅशनल कराटे) यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
डॉ. शंकर चामे यांनी ‘व्यक्तीच्या हृदयाच्या परिवर्तनाची चळवळ म्हणजे स्काऊट गाईड’ असे मत प्रास्ताविकातून व्यक्त केले. बबनराव ढोकाडे यांनी आपल्या भाषणात विपरीत परिस्थितीत आपले मनोबल ढळू न देता योग्य प्रकारे जगण्यास शिकवणारी चळवळ म्हणजे भारत स्काऊट गाईड होय. ही चळवळ या तीन दिवसांपूर्तीच मर्यादित न राहता आपल्या जीवनामध्ये सदैव जागृत ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. जीवनकुमार मद्देवाड यांनी उपस्थित सर्व युनिट लीडर्सना उद्देशून कोणत्याही कार्याची सुरुवात स्वतः पासून करावी आणि मगच ते कार्य दुसऱ्याला सांगावे असा मोलाचा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणात विनायकराव पाटील यांनी स्वतःसाठी जगण्यासोबतच आपण दुसऱ्यांसाठी कसे जगावे ही शिदोरी या स्काऊट गाईडच्या मेळाव्यातून आपणास मिळाली आहे. ही शिदोरी आपणास पुढील जीवनात कामी येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी मेळाव्यामध्ये पार पडलेल्या तीन दिवशीय वेगवेगळ्या स्पर्धांमधील विजयी पथकाला तसेच सहभागी सर्व युनिट लीडर्स, कब-बुलबुल व स्काऊट गाईड यांनाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रवीण गिरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, सोनवळे सर, युवराज माने, जे. एस. कनले, अंकुश केंद्रे, वरिष्ठ लिपिक सचिन सुरवसे, धोंडीराम पाटील, सुगावे बालाजी, मनोजकुमार मठपती, प्रमोद कटके, नामदेव हराळे, रमेश नलमले, स्वामी विजयालक्ष्मी, स्वामी शुभांगी, आरती कोल्हे, जगदीश केंद्रे, जयप्रकाश कंदले, वाडीकर, क्राईस्ट शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. तीन दिवसीय कॅम्प गोविंद केंद्रे व डॉ.शंकर चामे यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीपणे पार पडला.
