महाराष्ट्रातील 11000 ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना आमदार बनसोडे यांच्या पुढाकाराने मिळाला न्याय !
महाराष्ट्रातील 11000 ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना आमदार बनसोडे यांच्या पुढाकाराने मिळाला न्याय !
सार्वजनिक ग्रथालयास 40%वाढ व वर्ग बदलास हिरवा कंदील, ग्रंथालय चळवळीत आनंद
लातूर (एल.पी.उगीले) : 2012 महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालय संघाच्या अनेक प्रश्नांच्या संदर्भात शासन उदासीन होते. ग्रामीण भागातील सार्वजनिक ग्रंथालयात काम करणारा कर्मचारी हा केवळ 70 रुपये दररोज मोबदला घेऊन काम करतो आहे. हे अत्यंत विदारक चित्र आहे. शासनाने किमान वेतन कायद्यान्वये सातशे रुपये एका कामगाराला मिळावेत असा निर्णय घेतला आहे, मात्र ग्रंथालयाच्या बाबतीत प्रचंड उदासीनता होती. त्या उदासीनतेला बगल द्यावी अशी मागणी ग्रंथालय संघाच्या कर्मचाऱ्यांची होती.
उदगीरचे आमदार तथा राज्याचे माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी राज्यातील अकरा हजार एकशे पन्नास ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने अनुदान वाढी सोबतच, ग्रंथालयाच्या दर्जा बदलास संदर्भातही शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन ग्रंथालय चळवळीला न्याय दिला आहे. लातूर जिल्ह्यातील माजी क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे आणि औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार या दोघांच्या पुढाकाराने हा निर्णय झाल्यामुळे राज्यातील सर्व ग्रंथालयाच्या वतीने यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले जात आहेत.
राज्यातील ग्रंथालयांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री आ.संजय बनसोडे व आ.अभिमन्यु पवार यांच्या पुढाकारातून मंत्रालयात बैठक घेतली. राज्यातील 11 हजार 150 ग्रंथालयाच्या अनुदानात 40 टक्के वाढ, ग्रंथलयांच्या दर्जात सुधारणा, तसंच नवीन 2000 ग्रंथालयांना मान्यता देण्यात येणार असल्याचं तत्वत: मान्य केले आहे. त्याबद्दल तात्काळ कार्यवाही सुरु करण्याच्या सुचना संबधित सचिव,अधिकिर्यांना देण्यात आल्या आहेत.
माजी मंत्री आ. संजय बनसोडे व आ. अभिमन्यु पवार यांच्या पुढाकारातून सार्वजनिक ग्रथालयाच्या प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटिल यांनी मंत्रालयात बी. वेणुगोपाल रेड्डी प्रधान सचिव उच्च व तंत्रशिक्षण,सचिव विकासचंद्र रस्तोगी , ग्रंथालय विभागाचे प्र.संचालक अशोक गाडेकर ,सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रतिनिधी समवेत बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकित सार्वजनिक ग्रंथालयाचे विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. 2012 वर्षापासुन सार्वजनिक वाचनालयाचे वर्ग बदल बंद आहेत. ड वर्ग ची वाचनालये अधिक आहेत. दर्जा वाढ करण्यासाठी किती रक्कम लागेल असे प्र.संचालक अशोक गाडेकर यांना विचारले असता वर्ग बदलसाठी विस कोटी रुपये लागतील असे सांगताच, ही रक्कम उच्च व तंत्रशिक्षण विभागातून देतो. असे ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले व वर्ग बदलाची कार्यवाही तात्काळ सुरु करण्याच्या सुचना दिल्या. 40%अनुदान वाढिचा प्रस्ताव तयार करुन मंत्री मंडळ बैठकित ठेवण्याच्या सुचना केल्या. यासाठी आ. अभिमन्यु पवार व माजी मंत्री आ.संजय बनसोडे या दोघांना समर्थनार्थ पत्र द्यावे, असे सांगीतले.ग्रंथालय कर्मचार्यांना किमान वेतन मिळावे अशी मागणी राम मोतीपवळे व संजय सुर्यवंशी यांनी उपस्थित केली असता ना.चंद्रकांत दादा पाटिल म्हणाले की, कर्मचारांना किमान वेतन देणे अशक्य असुन अनुदानातुनच कर्मचाऱ्यांचे वेतन करावे असे सांगीतले. ग्रंथ खरेदी संर्भात ना.चंद्रकांत पाटिल म्हणाले की, जिल्हा नियोजन मंडळाला जो निधी दिला जातो, त्यातून 1% निधी ची तरतूद करण्याचा प्रयत्न आहे . ग्रंथालयांनी ग्रंथाची निवड करायची व हे ग्रंथ जिल्हा नियोजन मंडळाकडुन खरेदी करुन सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या वर्गवारी नुसार पुरवठा केला जाईल. यातुन ग्रंथ खरेदीचा ग्रंथालयाचा भार कमी होणार आहे.असे सांगून यासाठी माजी मंत्री आ.संजय बनसोडे व आ. अभिमन्यू पवार यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. ना.चंद्रकांत दादा पाटिल यांनी बोलवलेली बैठक यशस्वी पणे पार पडली. यात वर्गबदल, ,40%अनुदान वाढ करण्याचा निर्णय ना चंद्रकांतदादा पाटिल यांनी घेतला.
या बैठकीस राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार ,ग्रंथालय भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशेखर बालेकर, ग्रंथालय भारतीचे सुनील वायाळ,राज्य ग्रंथालय संघाचे कार्योपाध्यक्ष राम मेकले,महाराष्ट्र राज्य
ग्रंथालय कर्मचारी विकास परिषद अध्यक्ष सदाशिवराव बेडगे, डि.बी. देशपांडे , लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर कापसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कोषाध्यक्ष राम मोतीपवळे, संजय सुर्यवंशी, अहिल्यानगर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सुरेंद्र शिंदे, विष्णुपंत पवार,
बालाजी कांगणे इत्यादी उपस्थित होते. सकारात्मक चर्चा करून आपल्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या 40 टक्के अनुदान वाढ देणे आणि वर्ग बदल, नवीन ग्रंथालयास मान्यता या बाबतीत मंजूरी देण्यासाठी लवकरच निर्णय घेतला जाईल. असे आश्वासन दिले आहे.
ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांना योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
