लोकशाहीचा सुखी संसार हे शिवबाचे स्वप्न होते – प्रा.डॉ.गणेश बेळंबे
लोकशाहीचा सुखी संसार हे शिवबाचे स्वप्न होते - प्रा.डॉ.गणेश बेळंबे
उदगीर (एल.पी.उगीले) : आपल्या रयतेतल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला त्रास होता कामा नये.रयतेतली प्रत्येक स्त्री अतिशय सुरक्षित राहायला हवी.स्त्रीविषयी आदर प्रत्येकाने बाळगायला हवा. रयतेत स्वातंत्र्य, समता, बंधुता व मानवता ही सगळी मूल्य रुजली पाहिजेत. असे छत्रपती शिवाजी महाराजांना वाटत होते. एकंदरीत लोकशाहीचा सुखी संसार हेच शिवबाचे स्वप्न होते, असे विचार डॉ.गणेश बेळंबे यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयाच्या वतीने दावणगाव येथे बहि:शाल व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकाश साखरे, तर प्रमुख वक्ते म्हणून कै.बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालय येथील तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. गणेश बेळंबे हे उपस्थित होते. याशिवाय मंचावर बहि:शाल व्याख्यानमालीचे संचालक डॉ.दत्ताहरी होनराव, प्रा.डॉ.सुशीलप्रकाश
चिमोरे यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला मानवता प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशन बिरादार व डॉ.दत्ताहरी होनराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
‘शिवरायाचे आठवावे रूप’ या विषयावर बोलताना पुढे डॉ.बेळंबे म्हणाले की, शिवरायांनी अनेक लढाया अमावस्येच्या रात्री केल्या. किल्ले बांधून किल्ल्याची वास्तुशांती केली नाही. कारण दैववादापेक्षा
कर्मवादावर त्यांचा विश्वास होता. केवळ राजकारणासाठी शिवाजीचा वापर होता कामा नये, तर शिवरायांच्या चरित्र व कार्याचा मुळातून अभ्यास करणे गरजेचे आहे. असे सांगत अनेक अभ्यासकाचे व साहित्याचा संदर्भ देत श्रोत्यांना त्यांनी अंतर्मुख केले.
कार्यक्रमास प्रा.धनराज बंडे, डॉ.म.ई. तंगावार, प्रा. वीरभद्र बिरादार, डॉ विठ्ठल गोरे, ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानवता प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी प्रयत्न केले.
सूत्रसंचालन डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे तर आभार रमेश जाधव यांनी मानले.
