उदगीरच्या पत्रकारांचा आदर्श इतरांनी घ्यावा – आ.संजय बनसोडे
उदगीरच्या पत्रकारांचा आदर्श इतरांनी घ्यावा - आ.संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातील पत्रकार हे जागरूक पत्रकार असून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे काम ते करत असतात. उदगीरच्या विकासात येथील पत्रकारांचेही मोलाचे योगदान असून वास्तववादी लिखाण करणारे पत्रकार बांधव हे समाजाला आरसा दाखवण्याचे काम करतात. वेळ प्रसंगी कडक भूमिका घेऊन समाजातील चांगल्या, वाईट घटना प्रशासनासमोर मांडून ते सर्वसामान्यांना न्याय मिळवून देतात. एखाद्या प्रश्नासंबंधी जिद्द व चिकाटीने काम करण्याची हातोटी येथील पत्रकारांमध्ये असल्यानेच गेल्या
४० वर्षापासूनची पत्रकार भवनाची मागणी पूर्ण होत आहे. म्हणून उदगीरच्या पत्रकारांचा आदर्श इतरांनी घ्यावा. असे मत माजी क्रीडामंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर येथील पत्रकार भवनाच्या भूमीपुजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, नायब तहसीलदार राजश्री भोसले, उपविभागीय अभियंता एल.डी. देवकर,श्याम डावळे, युवराज धोतरे, भरत चामले, समीर शेख, बालाजी भोसले, सय्यद जानीमियाँ, शशिकांत बनसोडे, अनिल मुदाळे, शंकर रोडगे, ॲड.वर्षा कांबळे, पृथ्वीराज पाटील, महेश बिरादार, बन्सीलाल कांबळे, मोतीलाल डोईजोडे, मुकेश भालेराव, ॲड. अजिंक्य रेड्डी, अनिरूद्ध गुरुडे,
आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकार भवन कृती समिती पदाधिका-यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देवून आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, मागील ४ दशकापासुन पत्रकार बांधवांना हक्काची जागा उपलब्ध नव्हती म्हणून पत्रकार बांधवांची गैरसोय होत होती. मागील काळात त्यांनी माझ्याकडे मागणी करुन त्याचा सतत पाठपुरावा केला, त्यामुळे त्यांना मी मंत्री असताना ४ कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देवून महाराष्ट्रात एक नंबरचे पत्रकार भवन उदगीरला उभारले जाईल अशी ग्वाही आ.बनसोडे यांनी दिली. उदगीरच्या विकासात येथील पत्रकारांचेही योगदान असुन पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याचे सांगितले.
या तीन मजली पत्रकार भवनमध्ये एक काॅन्फरन्स हाॅल, गेस्ट हाऊस, आदींचा समावेश असुन पत्रकार बांधवांच्या हक्काची ती जागा असेल असे ही म्हटले.
यावेळी उदगीर येथील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
