छत्रपती जन्माला येत नसतात तर ते घडवावे लागतात – शिवश्री शिवशंकर लांडगे
छत्रपती जन्माला येत नसतात तर ते घडवावे लागतात - शिवश्री शिवशंकर लांडगेछत्रपती जन्माला येत नसतात तर ते घडवावे लागतात - शिवश्री शिवशंकर लांडगे
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापनेची जे स्वप्न पाहिले ते साक्षात शिवबा सारख्या पुत्राला घडवून शहाजीराजांचे स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य राजमाता जिजाऊ मॉसाहेबांनी केले. असे छत्रपती जन्माला येत नसतात तर ते घडवावी लागतात, असे स्पष्ट प्रतिपादन सुप्रसिद्ध शिवव्याख्याते शिवश्री शिवशंकर लांडगे यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘शिवजन्मोत्सव ‘ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक तथा शिक्षण तज्ज्ञ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर किसान पीठावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते शिवश्री शिवशंकर लांडगे, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. बब्रुवान मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाप्रसंगी पुढे बोलतांना शिवश्री शिवशंकर लांडगे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकरी, कष्टकरी, स्त्रिया, साधुसंत, महंत , फकीर आदींच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी स्वराज्याची स्थापना वयाच्या चौदाव्या वर्षी केली. त्यांच्या स्वराज्यामध्ये अन्यायग्रस्त पीडित शोधूनही सापडत नव्हता कारण अन्यायग्रस्ताला न्याय देण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज स्वतः करत असत जर चुकून कोणावर अन्याय झाला तर स्वराज्याच्या सुप्रीम कोर्ट समजल्या जाणाऱ्या राजमाता जिजाऊ या सर्वांना न्याय देण्याचे कार्य करत होत्या. आपल्या मातेला स्वराज्याच्या सुप्रीम कोर्टाच्या स्थानी ठेवण्याचे महान कार्य आदर्श पुत्र तथा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मिरवणुका काढून, नाचून साजरी करण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणे आणि आचरणात उतरविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराज अवघे ४९ वर्षे आयुष्य जगले पण इतक्या कमी कालावधीमध्ये त्यांनी स्वराज्याची स्थापना करून जन कल्याणकारी राज्य निर्माण केले व २६० किल्ले जिंकून जगातील एक आदर्श राजा म्हणून ख्याती प्राप्त केली, असेही ते म्हणाले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या हिंदी विभागाचे ‘प्रयास’, क्रीडा विभागाचे ‘ध्यानचंद’, भूगोल विभागाचे ‘वसुंधरा’, समाजशास्त्र विभागाचे ‘संस्कार’, संस्कृत विभागाचे ‘ संस्कृत सुधा’, इतिहास विभागाचे ‘संस्कृती’, इंग्रजी विभागाचे ‘डेपोडील्स’, राज्यशास्त्र विभागाचे ‘सार्वभौमत्व’ व तत्वज्ञान विभागाचे ‘तत्त्व प्रकाश ‘ आदी भिती पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय संयोजक डॉ. बब्रुवान मोरे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांनी व आभार उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी मानले. यावेळी रोहिदास पवार, दत्तात्रय कदम, विक्रम शिंदे, अमोल माने, संजय कदम, प्रा. राहूल गोणे यांच्यासह अहमदपूर शहरातील व पंचक्रोशीतील नागरिक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
