मंत्री पद असो नसो जनतेच्या सेवेत कमी पडणार नाही : आ. संजय बनसोडे
मंत्री पद असो नसो जनतेच्या सेवेत कमी पडणार नाही : आ. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : मागील पाच वर्षांच्या काळात उदगीर मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला आहे. हजारो कोटींचा विकास निधी आणून मतदार संघाच्या वैभवात मोठी भर टाकली आहे. जिल्हा निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कार्यालयांची निर्मिती करून उदगीर जिल्हा निर्मितीकडे एक पाऊल टाकले आहे. उदगीर शहरातील विकासात भर टाकण्यासाठी तहसील कार्यालय, पंचायत समिती, विविध समाजाचे सभागृह, प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन अशा विविध कार्यालयाच्या भव्य दिव्य इमारती उभारण्या सोबत, परिवहन कार्यालयाची स्थापना केली. विविध समाजघटकांना न्याय देत असताना शहरातील विविध विकास कामासाठी मोठ्या प्रमाणात राज्य शासनाकडून निधी खेचून आणत उदगीरचा कायापालट केला, आणि हे कार्य असेच पुढे चालु राहणार आहे. आपल्याकडे मंत्री पद असो अगर नसो जनतेच्या सेवेत कधीही कमी पडणार नसल्याची ग्वाही माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी दिली.
ते उदगीर तालुक्यातील लोहारा येथे आयोजीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी सेवानिवृत्त हवालदार अंगद मोगले, सौ.वैशाली मोगले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, लोहारा येथील सरपंच सौ.महादेवी कांबळे, उपसरपंच शंकर भातमोडे, पोलीस पाटील दिलीप पाटील, सुनिल केंद्रे, श्याम सोनटक्के,राम सोनटक्के, मोहन पाटील, विजय कांबळे, नरसिंग रेड्डी मोगले, कॅ.बालाजी बिरादार, ओमप्रकाश गिरी महाराज, शेषेराव धनबा, संजीव आजणे, दिलीप कावळे, तातेराव बिरादार यासह सेवानिवृत्त अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, मागील पाच वर्षात मतदार संघाचा विकास आराखडा तयार करुन ‘जे जे नव ते माझ्या उदगीरला हव, ‘ म्हणून काम केले. भविष्यात आता उदगीरला एअरपोर्ट व पायलटचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यासाठी एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर मतदार संघातील मंजूर असलेल्या एम.आय.डी.सी मध्ये मोठे उद्योग उभारून येथील बेरोजगारीचा प्रश्न सोडवणार आहे. लोहारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकासाठी निधी देणार असुन आजपर्यंत ३ कोटी रुपयाचा विकासनिधी लोहारा गावासाठी दिला आहे. भविष्यात शेतक-यांना दिवसा विज देण्याचे माझे स्वप्न असुन तो ही प्रश्न लवकरात लवकर सोडवणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी लोहारा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
