उदगीर ग्रामीण पोलिसांच्या डीबी पथकाची कामगिरी धमाल !! सहा घरफोड्या उघड करून 14 लाखाहून अधिकचा जप्त केला मुद्देमाल !!
उदगीर ग्रामीण पोलिसांच्या डीबी पथकाची कामगिरी धमाल !! सहा घरफोड्या उघड करून 14 लाखाहून अधिकचा जप्त केला मुद्देमाल !!
रोखठोक
ॲड. एल.पी.उगीले
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका नंतर एक धडाकेबाज मोहीम राबवत तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. जणू काही आपला वेगळा हातखंडाच या विशेष पथकाने निर्माण केला आहे. असे म्हटले तर वावगे ठरू नये.
उदगीर शहर हे महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्रा, तेलंगणा या चार राज्याच्या सीमेवर असल्यामुळे कुठेही गुन्हे करायचे आणि निवांतपणे उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये येऊन त्या गुन्ह्याचा मुद्देमाल लपवायचा किंवा त्याची विल्हेवाट लावायची. अशा पद्धतीचे काही गुन्हे यापूर्वी झाले होते. मात्र महाराष्ट्रातील वेगवेगळ्या 56 घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये हवा असलेला अट्टल घरफोड्या करणारा चोरटा उदगीर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या हुशारीने हिंदी चित्रपटातील प्रसंगाला साजेल अशा पद्धतीने उत्कृष्ट तपास करून शोधून काढला आहे.
या आरोपीवर आतापर्यंत पुणे येथील सहकार नगर पोलीस स्टेशन तसेच पुणे जिल्ह्यातील नारायणगाव पोलीस स्टेशन, पुणे येथील निगडी पोलीस स्टेशन, पुणे जिल्ह्यातील कोंढवा पोलीस स्टेशन आणि या परिसरातील इतर पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास 56 घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत. सन 2021 ते 2025 पर्यंत या चोरट्यांने घरफोड्या केल्या आहेत. त्याच्याकडून जवळपास 18 तोळे सोने आणि युनिकॉर्न मोटरसायकल असा एकूण 14 लाख 63 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये उदगीरच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे.
लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उदगीरचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर आणि उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, पोलीस हवालदार राम बनसोडे, नामदेव चेवले, राजकुमार डबेटवार, सचिन नाडागुडे, राजकुमार देवडे, नागरगोजे यांच्या विशेष पथकाने ही कामगिरी यशस्वी करून दाखवली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, 31 जानेवारी रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक भिसे, पोलीस हवालदार राम बनसोडे, नागरगोजे, नामदेव चेवले, सचिन नाडागुडे, राजकुमार डबेटवार हे रात्रीच्या गस्तवर असताना, पोलीस स्टेशन हद्दीतील बिदर गेट परिसरात खाजगी वाहनाने गस्त घालत असताना, अचानक त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, निडेबन हद्दीतील सरस्वती कॉलनी परिसरात एक इसम संशयास्पद रित्या फिरताना दिसून येत आहे. सदरच्या माहितीची खातरजमा करत या पथकाने सरस्वती कॉलनी कडे धाव घेतली. मात्र पोलिसांचा सुगावा लागताच युनिकॉर्न मोटरसायकल वरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस पोहोचल्याने त्याच ठिकाणी मोटरसायकल सोडून देऊन चोरट्याने फरार होणे योग्य समजले. आणि तो अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या पथकाने त्या ठिकाणी आढळून आलेल्या युनिकॉर्न मोटरसायकल वरून त्याच्या मालकाचा शोध घेतला असता, त्या मोटार सायकलचा मालक हनुमंत लक्ष्मण लष्करे रा. बेंगलोर हा असल्याचे निष्पन्न झाले.
जिल्हा पोलीस अधीक्षकांना या संदर्भात सविस्तर माहिती देऊन विशेष पथकाने लगेच तपासात बेंगलोर गाठले. त्या ठिकाणच्या सायबर सेलच्या आणि लातूरच्या सायबर सेलच्या शैलेश सुडे त्यांच्या मदतीने हनुमंत लष्करे याचा शोध घेतला. त्याच्याकडे विचारपूस केली असता सदरील मोटारसायकल ही त्याचा मोठा भाऊ अंकुश लक्ष्मण लष्करे (रा. राजनगर, निगडी, पुणे) हा वापरत असल्याचे समजले. त्यानंतर या विशेष पथकाने आपला मोर्चा पुणे जिल्ह्यामध्ये वळवला. परंतु तो पर्यंत आरोपी त्या नमूद पत्त्यावर आढळून आला नाही. तो मुंबई, डोंबिवली येथे राहत असलेल्या त्याच्या बहिणीकडे (राधा कुसळकर) गेला असल्याचे समजले. त्यावरून या पथकाने राधा कुसळकर यांच्या घरी राहात असल्याची खात्री केली. मात्र आरोपी अत्यंत चाणाक्ष असल्याने त्याला फरार होण्याची संधी देऊ नये म्हणून, या गुन्हे प्रकटीकरण शाखेने हिंदी चित्रपटात ज्या पद्धतीने वेशांतर करून घरात प्रवेश करतात. त्याच पद्धतीने एम एस ई बी चे कर्मचारी बणून हे पथक राधा कुसळकर यांच्या घरी गेले. त्या ठिकाणी अंकुश लक्ष्मण लष्करे यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे रीतसर चौकशी केल्यानंतर आरोपी अंकुश लक्ष्मण लष्करे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील अनेक ठिकाणी घरफोड्या करून सोन्या चांदीचे दागिने चोरल्याची कबुली दिली. चोरी करण्यामागचा उद्देश आपल्याला आईच्या आजारासाठी पैशाची गरज होती, असे सांगून त्यांनी घरफोड्या केल्या आणि त्या घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याकडे गहाण ठेवले असल्याचे सांगितले. जप्ती पंचनामाप्रमाणे सदरील सोन्या चांदीचे दागिने या पथकाने जप्त केले आहेत.
सन 2017 ते 2021 पर्यंत अंकुश लष्करे यांनी पुणे जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणात घरफोडी केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुळात उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील गीता ज्ञानेश्वर साखरे (रा. एसटी कॉलनी, समर्थ नगर, उदगीर) यांच्या तक्रारीवरून नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्हा रजिस्टर नंबर 661/ 24 कलम 305, 331 (4) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या संदर्भात पोलीस पथक तपास करत असताना हा आरोपी हाती लागल्याने अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सात गुन्ह्यातील मुद्देमाल या आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. उदगीर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उदगीर पंचक्रोशीतून पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास उदगीर ग्रामीणचे जेष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सखाराम भिसे आणि संदीप केंद्रे यांच्याकडे सोपवला आहे.
