सहकार चळवळ समृद्ध करून, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
सहकार चळवळ समृद्ध करून, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : माझी जन्मभूमी शिरूर ताजबंद असली तरी, कर्मभूमी अहमदपूर आहे. या कर्मभूमीतील अठरा पगड जातीच्या मतदारांनी मला मतदार रुपी आशीर्वाद देऊन तिसऱ्यांदा निवडून दिले. यामुळे आज मी तुमच्यापुढे सहकार मंत्री म्हणून उभा आहे. तर मला मिळालेल्या संधीचा फायदा करून घेण्यासाठी राज्यात सहकार चळवळ समृद्ध करून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करावयाचे आहेत असे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.
गुरुवार दि. २७ फेब्रुवारी रोजी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व घटक पक्षाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले होते. माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आ. रत्नाकर गुट्टे, आ. प्रताप पाटील चिखलीकर, शिक्षक आ. विक्रम काळे, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, अफसर शेख, बाबासाहेब कांबळे, गोपाळ माने यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, कृ ऊ बा सभापती मंचकराव पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, अशोक केंद्रे, किशोर मुंढे, त्र्यंबक गुट्टे, ॲड. भारत चामे, ॲड.व्यंकट बेद्रे यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून, गर्जा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्र गीताचे गायन करून नागरी सत्कार समारंभाचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी नागरी सत्कार संयोजन समितीच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा जंगी सत्कार करण्यात आला. त्यानंतर सकल मराठा समाज, भारतीय जनता पार्टी, रिपाई, शिवसेना, वकील संघ आणि विविध संघटनांच्या वतीने ना. बाबासाहेब पाटील यांचा फटाक्याच्या आतिशबाजित, विद्युतरोषणाईत भव्य असा सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की, आपले प्रेम हीच माझी ताकद आहे. या ताकतीचा फायदा कोणाला जिरवण्यासाठी करायचा नसून, केवळ मतदार संघासह राजाच्या विकासासाठी आहे. मोठ्या स्वरूपाच्या सोसायट्यांना टॅगचे काम करावयाचे आहे, पेट्रोल पंप, वेअर हाऊस द्यायचे आहेत यातून सहकार चळवळ वाढीस नेऊन त्यांना सक्षम बनवून युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करावयाचे आहेत. ज्या दिवशी अंतेश्वर च्या पाण्याने मतदार संघातील बळीराजाची शेती ओलीताखाली येईल तेव्हाच मला खरा आनंद मिळणार आहे. या सत्कार सोहळ्यात मला शिक्षण महर्षी, साखर महर्षी ही उपमा दिली, त्याचे सर्व श्रेय माझे चुलते माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांना दिले जाते. त्यांचाच आदर्श घेऊन मी काम करत आहे.
मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलो. त्याचे फलित म्हणजे २५०० कोटीचे कामे करण्यात आली, यातून अनेक ऑफिसेस, पाणी, रोडचे कामे करण्यात झाली. आमच्या सरकारने पोलीस पाटील, अंगणवाडी सेविकाच्या पगारी वाढवल्या, लाडकी बहिण योजना अमलात आणली या योजना कदापी बंद होणार नसल्याचे सांगितले.
शेवटी बोलताना म्हणाले खाते वाटपाच्या वेळी मला जे सहकार क्षेत्र दिले ते सुद्धा वरिष्ठांनी विचार करून दिलेले आहे. पश्चिम महाराष्ट्र विकसित आहे, मराठवाडा विकसनशील आहे, सोबत विदर्भ आहे म्हणून मराठवाडा विदर्भाच्या विकासाचा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून विकास करून उपेक्षितांना न्याय मिळावा हा उद्देश आहे.
पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले अध्यक्षीय समारोपात ना. पाटील यांना शुभेच्छा देताना म्हणाले की माझे पिताश्री अभयसिंहराजे भोसले यांनी चालवलेले सहकार खाते आज बाबासाहेब पाटील चालवत आहेत आणि त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे म्हणून मी खूप लकी, आनंदी आहे. जरी पालकमंत्री असलो तरी वयाने, अनुभवाने कमी आहे त्यामुळे त्यांचा सन्मान राखणे मी माझी कर्तव्य समजतो. असे सांगून पंतप्रधान मोदीजी यांनी जाहीर केलेला योजना बंद पडणाऱ्या नसून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी चालू केलेल्या योजना कदापिही बंद पडणार नाहीत कारण लाभार्थ्याच्या योजना, गरजू स्त्रियांसाठी चालू केलेल्या योजना बंद पडणार नसल्याचे सांगून विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका असे सांगितले. तसेच पश्चिम महाराष्ट्रापेक्षा लातूर जिल्ह्यात किंबहुना मराठवाड्यात छत्रपती घराण्यावर प्रेम,श्रद्धा, निष्ठा, करणारे जास्त असल्याचेही आवर्जून सांगितले.
