वेदनेतूनच प्रतिभेला पंख फुटतात – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

0
वेदनेतूनच प्रतिभेला पंख फुटतात - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

वेदनेतूनच प्रतिभेला पंख फुटतात - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

‘मराठी भाषा गौरव’ दिनानिमित्त ललित लेखक प्राचार्य डॉ वसंत बिरादार यांची’ ऐसपैस ‘ मध्ये प्रकट मुलाखत
अहमदपूर (गोविंद काळे) : प्रतिभावंताला जात नसते. दुःख आणि वेदनेतूनच प्रतिभेला पंख फुटतात. जो दुसऱ्यांचे दुःख जाणतो तोच खरा प्रतिभावंत साहित्यिक असतो, असे मत प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी ‘ ऐसपैस’ च्या प्रकट मुलाखतीत मांडले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात’ मराठी भाषा गौरव दिन’ व ‘कवी कुसुमाग्रज’ जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह. भ. प. डॉ. अनिल महाराज मुंढे हे होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांची मुलाखत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अनेक कंगोरे असलेले प्रश्न विचारले. काही रॅपिड फायर स्वरूपाचे तर काही एस.नो. स्वरूपात होते. एकूणच या मुलाखतीमध्ये प्राचार्य डॉ वसंत बिरादार यांनी साहित्याच्या अंगाने विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. आपल्या जीवनात प्रत्येक माणसाला विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागते. त्यातील महत्त्वाच्या अनुभवांना शब्दांत गुंफता, मांडता आलं पाहिजे, असेही सहज प्रतिपादन त्यांनी केले.
‘ हिरवे झंकार ‘, ‘ सावली सावली ऊन दे’ आणि ‘ भावानुबंध ‘ या ललित लेख संग्रहाची निर्मिती प्रक्रियाही त्यांनी रंजकपणे सांगितली. तसेच कविता, कथा, नाटक या साहित्य प्रकारांच्या लेखनातील आपले वेदनेचे गहिरे परिमान असलेले विविध चिंतनात्मक अनुभवही सांगितले. तसेच भटक्या विमुक्त जमातींच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी कादंबरी बद्दलची ‘भूमिका ‘ ही त्यांनी यावेळी नमूद केली.
यावेळी अध्यक्षीय भाषणात ‘ मराठी भाषा आणि तिची परंपरा ‘ या विषयावर ह.भ.प.डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्रोही कवी व समीक्षक डॉ. मारोती कसाब यांनी केले तर संस्कृत विभाग प्रमुख तथा नॅक समन्वयक डॉ. प्रशांत बिरादार यांनी आभार मानले. दोन तास चाललेल्या या ‘ऐसपैस’ मुलाखत ‘कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!