युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी विवेक जाधव यांची निवड
युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी विवेक जाधव यांची निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस पक्षाला मोठ्या प्रमाणात धक्का बसल्यानंतर, पुन्हा पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने सुरुवात केली आहे. उदगीर परिसरातही काँग्रेसची ताकद वाढावी. या उद्देशाने युवक काँग्रेसमध्ये फेरफार करून नवीन कार्यकारणी निवडण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातील संघटन कुशल नेतृत्व असलेले विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सर्व चेअरमन आणि संचालकांची संघटना उभारण्याची ताकद आपल्यात आहे, हे दाखवून दिलेले विवेक पंडितराव जाधव यांची निवड उदगीर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी पक्षश्रेष्ठींनी केली आहे. लातूर येथील काँग्रेस भवन येथे झालेल्या कार्यक्रमांमध्ये या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्रही देण्यात आले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंखे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याणराव पाटील, जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुतीराव पांडे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीलाताई पाटील, उदगीर शहराध्यक्ष मंजूर खा पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार बिराजदार यांनी या नियुक्त जाहीर केल्या आहेत.
पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर मोठा विश्वास दाखवून आपली तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. याची जाणीव ठेवून पक्ष संघटन बांधणीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. आपण कायम काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी बांधील असून सतत सर्वधर्मसमभावाचा विचार जनसामान्यांच्या मनामध्ये पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला आहे. भविष्यातही करत राहणार. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही एकमेव सर्वसामान्य माणसांना घेऊन चालणारी आणि जातीपातीला कुठलाही थारा न देणारी संघटना आहे. संविधानाने दिलेल्यास समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही विचारधारा रुजवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही याप्रसंगी निवडीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विवेक जाधव यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या माध्यमातून तालुका पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपल्याला आनंद वाटत असून, या संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने संघटन बांधणे, संघटन मजबूत करणे यासाठी आपण सतत प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्ष अल्पमतात असला तरीही निवडणुकीच्या दरम्यान झालेली सौदेबाजी आणि ईव्हीएम ची जादू लोकांना कळाली आहे. त्यामुळे जनमानसाचा कौल काँग्रेसच्याच बाजूने आहे. आपण सर्वसामान्य माणसाचा आवाज उठवण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. अत्यंत योग्य व्यक्तिमत्त्वाची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून विवेक पंडितराव जाधव यांचे अभिनंदन केले जात आहे.
