कृषि महाविद्यालयाचा राज्यस्तरीय उत्तर भारत शैक्षणिक दौरा संपन्न
कृषि महाविद्यालयाचा राज्यस्तरीय उत्तर भारत शैक्षणिक दौरा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत चालणाऱ्या उदगीर तालुक्यातील कृषी महाविद्यालय डोंगरशेळकी तांडा येथील बी. एस्सी. कृषी पदवीच्या चौथ्या सत्रातील विद्यार्थी, विद्यार्थिनींचा राज्यस्तरीय उत्तर भारत शैक्षणिक सहल अभ्यास दौरा दिल्ली -उत्तर प्रदेश-हिमाचल प्रदेश- पंजाब राज्यांमधील राष्ट्रीय पातळीवरील नामांकित कृषी शिक्षण व संशोधन संस्था याबरोबरच ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन यशस्वीरित्या संपन्न झाला. विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वृद्धिंगत करणे, त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनाशक्तीला पुरेशी संधी उपलब्ध करून देणे आणि पदवी शिक्षणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व उद्योजकीय विकास रुजविणे अशा उदात्त हेतुने, या शैक्षणिक सहलीचे आयोजन दि २० फेब्रुवारी ते ०१ मार्च,२०२५ दरम्यान करण्यात आले होते. या शैक्षणिक सहलीमध्ये ७२ विद्यार्थी आणि ५ प्राध्यापक, प्राध्यापिका सहभागी झाले होते.
या शैक्षणिक सहलीच्या प्रथम चरणामध्ये दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषद आयोजित देशपातळीवरील पुसा कृषी विज्ञान मेळावा २०२५ मध्ये सहभाग घेऊन, विविध नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान विभागाला भेटी देण्यात आल्या. विविध राज्यातील कृषी संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कृषी व कृषी संलग्नित क्षेत्रामध्ये कार्यरत कंपन्या, पीक प्रात्यक्षिकाची विस्तृत माहिती घेतली. विस्तार शिक्षण विभागास प्रत्यक्ष भेट दिली असता, तेथील तज्ञ विभाग प्रमुख डॉ.सत्याप्रिया, डॉ. नैन व डॉ. सिंग यांनी विस्तार कार्याविषयी सविस्तर माहीती देऊन प्रयोगशाळा दाखवली. तसेच ऐतिहासिक लाल किल्ला आणि भारताचे प्रवेशद्वार या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती संपादित केली.
सहलीच्या द्वितीय चरणामध्ये, अग्रा येथील जगप्रसिद्ध वास्तू ताज महाल व मुघल गार्डन तदनंतर, वृंदावन स्थीत प्रेम मंदिर या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या विषयी माहीत जाणून घेतली. मनाली येथील डोंगराळ बर्फ आच्छादित प्रदेश, सोलन बर्फ खाडी, अंजनी महादेव देवस्थान खाडी, हीडिंबा देवी मंदिर , तिबेटीयन बुद्ध मठ इत्यादि स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन धार्मिक व आध्यात्मिक माहीती अवगत केली. कुलू येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्तेन, जिल्हा कुल्लू संस्थेला भेट देऊन प्रगत व आधुनिक पालेभाज्या व फळ लागवड तंत्रज्ञानाबद्दल माहीती अवगत केली. यामध्ये डॉ. चंद्र प्रकाश व डॉ. राज कुमार यांनी डोंगराळ भागातील फलोत्पादन व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठीचे विकसित तंत्रज्ञाना बद्दल मार्गदर्शन व माहिती दिली. कुल्लू येथे बियास नदीपात्राची महिती घेऊन , रिव्हर राफ्टिंग चा रोमांचक व सहासी अनुभव सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.
शैक्षणिक सहलीच्या शेवटच्या टप्प्यात अमृतसर (पंजाब) येथील शीख धर्मियांचे प्रार्थनास्थळ सुवर्णमंदिर ‘गुरुद्वारा’, जालियनवाला बाग, शेवटी आटारी (भारत-पाकिस्तान सीमा) येथे बीटिंग द रिट्रीट समारंभ प्रत्यक्ष उपस्थित राहून, माहीती जाणून घेतली. येथील बी. एस. एफ. दलातील सैनिकांची परेड बघून विद्यार्थ्यांमध्ये देशाबद्दल व देशाच्या रक्षणकर्त्या सैनिका बद्दल अभिमान जागृत झाला.
सदरील शैक्षणिक सहल, अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून सहलीत सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनींना कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, उद्यमशीलता, उद्योग व्यवसाय, हंगामानुसार पीक उत्पादन, उपलब्ध बाजारपेठा इत्यादी विविध कृषि क्षेत्रातील तांत्रिक मार्गदर्शन व माहिती प्राप्त झाली. सदरहू शैक्षणिक सहल नंदिग्राम कृषि एवंम ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. संग्रामजी पटवारी, सचिव गंगाधरराव दापकेकर यांचे आर्थिक व नैतिक पाठबळ लाभले. या सहलीच्या नियोजन व आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंगदराव सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ. आशोकराव पाटील, आहरण व संवितरण अधिकारी डॉ. आनंद दापकेकर व समस्त प्राध्यापक यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. शैक्षणिक सहल यशस्वी होण्यासाठी डॉ. शिवाजी माने, डॉ. दीपक पानपट्टे, डॉ. शिवशंकर वानोळे, प्रा. सचिन खंडागळे व प्रो. साहा. भाग्यश्री निडवंचे यांनी अथक परिश्रम घेतले.
